किटकॅट नावाच्या चॉकलेटने लहान मुलांची हौस भागवली. आता हेच नाव मोठय़ांसाठीही चर्चेत येणार आहे. अँड्रॉइडच्या नव्या ४.४ या किटकॅट व्हर्जनचे फोन बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. यातच या विंडोजनेही लुमिया ६३०च्या माध्यमातून ८.१ ही ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आणली आहे. यामुळे आगामी काळात किटकॅट आणि विंडोज ८.१ यामध्ये चांगलेच युद्ध रंगणार आहे. या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीममधील फरक आणि त्यावर आधारित नवीन फोन्सबद्दल जाणून घेऊया.

अँड्रॉइड ४.४ (किटकॅट)
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात गुगलने अँड्रॉइड ४.४ या नव्या ऑपरेटिंग सिस्टीमची घोषणा केली. पण ही ऑपरेटिंग सिस्टीम प्रत्यक्षात फोनवर येण्यासाठी बराच काळ जावा लागला. देशात सर्वाधिक विक्री ही २० हजार रुपयांच्या आतील किमतीच्या फोन्सची होत असते. यामुळे हा अंदाज लक्षात घेऊन कंपन्यांनी फोन्स तयार केले आहेत. अँड्रॉइडच्या आत्तापर्यंतच्या व्हर्जन्सपेक्षा यामध्ये काय वेगळे आहे हे आपण जाणून घेऊयात. अँड्रॉइडची ४.३ अर्थात जेलीबीन या ऑपरेटिंग सिस्टीमपेक्षा या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये खूप बदल करण्यात आले आहे. यातील विशेष म्हणजे यामध्ये ग्राफिक्स सपोर्टवर विशेष भर देण्यात आला असून गुगल इंटलिजन्स असिस्टन्सचा यामध्ये विशेष समावेश करण्यात आला आहे. ही सुविधा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना केवळ ‘ओके गुगल’ केले की गुगल इंटलिजन्स असिस्टंट सुविधा सुरू होते आणि आपण व्हॉइस सर्च करू शकतो. हा सर्च केवळ गुगल सर्चसाठी उपयुक्त असेल असे नाही तर या सर्चच्या माध्यमातून आपण गाणीही प्ले करू शकतो. याशिवाय या सुविधेमध्ये तुमच्या आवडीनिवडी जाणून त्याच्याशी संबंधित माहिती सातत्याने तुम्हाला मिळत राहील.
किटकॅट व्हर्जनमध्ये फोनच्या स्क्रीनवरही खूप बदल करण्यात आले आहेत. यामध्ये स्क्रीनच्या खालच्या बाजूस एक छोटासा मेन्यू बार देण्यात आला आहे. याशिवाय आपण जेव्हा अ‍ॅप लाँचरमध्येही विशेष बदल करण्यात आला आहे. तुम्ही तुमचा वॉलपेपर संपूर्ण स्क्रीनवर वापरू शकता. याचबरोबर नोटिफिकेशमध्येही आपल्याला यापुढे वॉलपेपर दिसू शकणार आहे. किटकॅटच्या मेन्यू टोग्गल्समध्ये ‘लोकेशन सेटिंग टोग्गल्स’चाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय गुगलच्या कीबोर्डमध्ये न्यूइमोटिव्ह कीबोर्डचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आपण आपल्या भावना विविध चित्रांद्वारे व्यक्त करू शकणार आहोत. यामध्ये नवीन फोन डायलर अ‍ॅप्लिकेशन देण्यात आले आहे. ज्याचा वापर आपण आपल्या नेहमीच्या संपर्कातील नंबर्स सेव्ह करण्यासाठी वापरू शकणार आहोत.
या ऑपरेटिंग सिस्टीमची आणखी एक खासियत म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये गुगलने एसएमएस आणि एमएमएससाठी नवीन हँगआऊट सुविधा दिली आहे. याचबरोबर गुगलच्या खात्यावर इन्स्टंट मेसेंजिंग सुविधाही देण्यात आली आहे. या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये गुगलने दोन नवीन प्रकारचे स्टेप्स सेन्सर्स दिले आहेत. यामध्ये वापरकर्त्यांला पायऱ्या चढताना आणि उतरताना फोन माहिती देऊ शकेल. इतकेच नव्हे तर धावताना आणि चालतानाही हे सेन्सर्स आपला माग घेऊ शकतील आणि आपल्याला विविध सूचना करू शकतील.
या ऑपरेटिंग सिस्टीमवरील फोन्स जलदगतीने काम करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले असून अगदी ५१२ एमबी रॅम असलेले फोनही व्यवस्थित काम करू शकतील, असा दावा गुगलने केला आहे. याचबरोबर या ऑपरेटिंग सिस्टीमला क्लाऊड प्रिंटिंग, कनेक्टिव्हिटी पर्याय खूप चांगले देण्यात आल्याचेही गुगलने स्पष्ट केले आहे.

स्वस्त आणि मस्त फोन्स
किटकॅट ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे २० हजार रुपयांच्या आतील किमतीच्या काही फोन्सविषयी माहिती घेऊयात.

मोटो ई 
मोटोरोला या कंपनीने अँड्रॉइड किटकॅटवर आधारित मोटो-ई हा फोन बाजारात आणला आहे. या फोनला ४.३ इंचांचा क्यूएचडी डिस्प्ले आहे. याला गोरिला ग्लास वापरण्यात आला असून त्याला वॉटर नॅनो कोटिंगही देण्यात आले आहे. हा फोन डय़ुएल सिम असून यामध्ये तुम्ही मायक्रो सिमकार्ड वापरू शकता. या फोनमध्ये ‘इंटलिजन्स कॉलिंग फीचर’ देण्यात आले आहे. फोनला १.२ गिगाहार्ट्झचा स्मार्टगार्ड स्नॅपड्रॅगन २०० प्रोसेसर देण्यात आला आहे. एक जीबी रॅम देण्यात आली असून पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. याची बॅटरी क्षमताही चांगली देण्यात आली असून ती १९८० अ‍ॅम्पिअरची देण्यात आली आहे.

किंमत – ६९९९ रुपये
याच कंपनीचा मोटो जी हा फोन सध्या जेलीबिनवर असला तरी तो किटकॅटवर अपग्रेड होऊ शकतो. याची किंमत १२४९९ रुपये आहे.

झोलो क्यू १०००
 झोला या कंपनीनेही किटकॅटवर आधारित फोन बाजारात आणला आहे. हा फोन ४.२ प्रणालीवर आधारित असून तो अपग्रेड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याचबरोबर कंपनीने पूर्णत: किटकॅटवर आधारित झोलो १००० ऊप्स बाजारात आणला आहे. डय़ुएल सिम असलेला हा फोन फॅबलेट म्हणूनही वापरता येऊ शकतो. यामध्ये पाच इंचांचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १.२ गिगाहार्ट्झचा ब्रॉडकॅम प्रोसेसर देण्यात आला आहे. एक जीबी रॅम आणि एलईडी फ्लॅशसह पाच मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे.
किंमत – ९९९९ रुपये

एलजी एल ७० 
किटकॅट ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित ‘एल’ सीरिज एलजीने बाजारात आणली आहे. यातील एल ७० हा फोन किटकॅटवर आधारित असून यामध्ये ४.५ इंचांचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनला ४०० गुणिले ८०० मेगापिक्सेल देण्यात आले आहेत. डय़ुएल सिमकार्डची सुविधा असणाऱ्या या फोनमध्ये १ जीबी रॅम देण्यात आली आहे. याशिवाय १.२ गिगाहर्ट्झचा स्नॅपड्रॅगन २०० प्रोसेसर देण्यात आला आहे. ऑटोफोकसची सुविधा असलेला पाच मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सेल असलेला फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे.
किंमत – १३५६० रुपये
याशिवाय याच कंपनीचा एल ९० हा फोनही किटकॅटवर आधारित आहे. याची किंमत १६७४५ रुपये आहे.

कार्बन टिटॅनियम ऑक्ट
मोठा डिस्प्ले देणे ही कार्बनची खासियत बनली आहे. या एकमेव कारणासाठी हे फोन्स भारतीय बाजारपेठेत गाजत आहेत. या कंपनीने किटकॅटवर आधारित कार्बन टिटॅनियम ऑक्टने हा फोन बाजारात आणला असून या फोनमध्ये १.७ गिगाहर्ट्झचा ऑक्टा कोर मीडिया टेक एमटी ६५९२ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये एक जीबी रॅम देण्यात आली असून फोनचा पाच इंचांचा एचडी डिस्प्ले आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे.
किंमत – १४४९० रुपये.
याच कंपनीचा टिटॅनियम हेक्सा हा फोनही या फोनमध्ये २ जीबी रॅम देण्यात आली आहे. याची किंमत १६९९० रुपये आहे. तर कार्बन टिटॅनियम ऑक्टने प्लस या फोनमध्येही दोन जीबी रॅम देण्यात आली असून फोनमध्ये १६ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा तर फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. हा फोन १७९९० रुपयांना २० मेपासून अमेझॉन डॉट कॉमवर उपलब्ध होणार आहे.

विंडोज ८.१
मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ८.१ या नवीन ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित फोन बाजारात येऊ लागले आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांच्या नवीन उपकरण विभागाच्या माध्यमातून लुमिया ६३० बाजारात आणला आहे. विंडोज ८.१ या ऑपरेटिंग सिस्टीमची खासियत म्हणजे यामध्ये आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखे अ‍ॅप्स सहज वापरता येऊ शकतात. इतकेच नव्हे तर आपल्याला आपला विंडोज आधारित संगणक, लॅपटॉप आणि फोन एकत्र जोडून स्काय ड्राइव्हच्या साहाय्याने विविध उपकरणांमधील फाइल्स वेगवेगळय़ा उपकरणांमध्ये ओपन करता येऊ शकतात. विंडोजवर आधारित फोन केवळ नोकिया लुमिया ६३० आणि मायक्रोमॅक्स या कंपनीने बाजारात हे फोन आणले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोकिया लुमिया ६३०
० ऑपरेटिंग सिस्टीम – विंडोज ८.१
० डिस्प्ले – ४.५ इंचाची क्लीअर ब्लॅक एलसीडी, गोरिला ३
० बॅटरी १८३० एमएएच
० कनेक्टिव्हिटी – थ्रीजी, जीएसएमची रेंज १९०० मेगाहटर्््झपर्यंत
० प्रोसेसर – १.२ गिगाहर्ट्झ क्वाड कोर
० कॅमेरा – पाच मेगापिक्सेल
० रॅम – ५१२ एमबी रॅम,
० मेमरी – आठ जीबी इंटर्नल मेमरी आणि कार्डच्या साहाय्याने १२८ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
० इतर – या फोनमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वन ड्राइव्ह, हीअर मॅप्स, ड्राइव्ह+, एक्सबॉक्स, मिक्स रेडिओ.
० किंमत – डय़ुएल सिम – ११५०० आणि सिंगल
सिम – १०५००.