मोबाइल गेम आणि त्यांचं वेड याविषयी आपण माहिती करून घेतली. खरं तर मोबाइलच्या दुनियेतील प्रत्येक गेम ‘अॅडिक्शन’ अर्थात खेळण्याचं व्यसन लावणारा असतो. त्यामुळे मनोरंजनासाठी गेम खेळत असताना काळजी घ्यायलाच हवी.
मोबाइल विशेषत: स्मार्ट फोनवर गेमचं एक स्वतंत्र दालनच उपलब्ध आहे. या दालनात लाखो गेम दिसून येतात. यातील लोकप्रिय गेमची संख्याच शेकडोंच्या घरात आहे. अगदी मेंदूला चालना देणारे, गणिती, अॅक्शन, मनोरंजनात्मक, आर्केड, सिम्युलेटिंग, ऑनलाइन अशा विविध वर्गामध्ये हे गेम विभागले गेलेले असतात. यातील अनेक गेम खरंच खेळणाऱ्यांचं मनोरंजन करतात, त्यांचा मानसिक ताण कमी करतात. मात्र बहुतांश गेम हे निव्वळ वापरकर्त्यांना गुंतवून ठेवणारे असतात. वापरकर्ता जितका जास्त वेळ हा गेम खेळत राहतो, तितक्या त्या गेमवर झळकणाऱ्या जाहिरातींची संख्या वाढते. थोडक्यात, संकेतस्थळांवरील जाहिराती जशा ‘पेज हिट्स’वर ठरतात, तसे मोबाइल गेमवरील जाहिराती वापरकर्ते तो किती वेळ खेळतात, यावर ठरतात. त्यामुळे या गेमचा प्रमुख उद्देश वापरकर्त्यांला गेमचं ‘व्यसन’ लावणं हाच असतो. अशा व्यसनाचा खेळणाऱ्याच्या मानसिक, शारीरिक सवयींवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिवाय एकदा खेळण्याचं वेड लागलं की त्या गेमच्या पुढच्या लेव्हल खेळण्यासाठी पैसे मोजण्याचीही तयारी वापरकर्ते दाखवतात. गेम खेळणाऱ्यांमध्ये लहान मुलांचं प्रमाणही अधिक असतं. त्यामुळे पालकांनीही याबाबत खबरदारी घेणं आवश्यक आहे.
गेमवरील शुल्क टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
* अॅपलच्या डिजिटल स्टोअरमध्ये मुलांचे ‘अलाऊन्स’ अर्थात त्यांना एखादे अॅप वा गेम खरेदी करायचा असेल तर ते किती रकमेपर्यंत खरेदी करू शकतात, याची मर्यादा ठरवता येते. ‘अलाऊन्स’ कमाल मर्यादेवर पोहोचल्यास वापरकर्त्यांला खरेदी करता येत नाही.
* गेम डाऊनलोड करतानाच तो सशुल्क आहे का याची चाचपणी करावी. बहुतांश वेळा गेम सुरुवातीला मोफत असतात. मात्र त्यातील पुढील लेव्हल किंवा टप्पे खेळण्यासाठी वापरकर्त्यांला रक्कम भरण्यास सांगितलं जातं. यावरही लक्ष ठेवून ‘इन अॅप पर्चेसेस’ अशी नोंद असलेल्या गेमबद्दल सतर्कता बाळगावी.
* मुलांकडून अनाहूतपणे गेम वा अॅपच्या खरेदीचा व्यवहार होऊ शकतो. हे टाळण्यासाठी प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरशी तुमचं कार्ड वा बँक अकाऊंट जोडू नका.
* मोबाइलवर नेट बँकिंगचं कनेक्शन ऑन असेल, ते ‘बार्टर’ करून ठेवलं असेल तर गेम खेळत असताना काही लेव्हलचे चार्जेस तसेच गेम खेळता खेळता येणाऱ्या लिंक अथवा जाहिरातींवर चुकून क्लिक केलं तर ते डाऊनलोड होऊन परस्पर पैसे वळते होतात.
मुलांमधील गेमचं वेड कसं थांबवाल?
* मुलांना वेळ द्या.
* त्यांना गेमपासून रोखणं अशक्य आहे. मात्र गेम खेळण्याची वेळ निश्चित ठेवा. त्याव्यतिरिक्त गेम खेळण्यावर बंदी घाला.
* शालेय विद्यार्थ्यांच्या हाती शक्यतो मोबाइल देऊ नका. अथवा त्यांच्या मोबाइलवरील ‘अॅक्टिव्हिटिज’वर लक्ष ठेवा.
* मुलांना मैदानी खेळांसाठी किंवा बैठय़ा पारंपरिक खेळांसाठी प्रोत्साहन द्या.
गेमचं वेड वाढल्यास..
* मानसोपचार तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा.
* वेड कमी करण्यासाठी तो खेळण्यावर स्वत:च निर्बंध आणा. ठरावीक वेळेतच तो खेळा.
* गेमपासून लक्ष विचलित करण्यासाठी अवांतर वेळ वाचन किंवा भटकंती यात घालवा.
प्रा. योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)