वस्तूंवरील क्यू आर कोड किंवा बार कोड वाचण्यासाठी मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅप आहे का?   – अक्षय चव्हाण

अनेक जाहिरातींत एखादा बारकोड दिला जातो जो स्कॅन केल्यावर तुम्हाला त्या उत्पादनाची माहिती लगेच मिळेल असं म्हटलं जातं. आता प्रश्न हा आहे की, बारकोड म्हणजे नेमकं काय आणि तो स्कॅन कसा करायचा. याचसाठी स्मार्टफोनमध्ये क्यूआर बारकोड अ‍ॅप्लिकेशन आहे. दिलेला बारकोड स्कॅन करून त्याची माहिती काही क्षणातच हे अ‍ॅप्लिकेशन देतं. नुकताच ब्लॉग्जसाठीही क्यू आर बारकोड सुरू झाला आहे. शॉपिंग करताना प्रॉडक्टवर किंमत दिसत नसेल तरी या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने त्या वस्तूची किंमत, संपूर्ण माहिती, ते का नवलंय, त्याची क्वॉँटिटी, क्वॉलिटी अशा सगळ्या गोष्टी दिसतात. तुम्ही फसण्याचा धोका कमीतकमी होतो. उदा. पाहायचं असेल तर तुमच्या आधारकार्डावरचा बारकोड स्कॅन करून पाहा. त्यावरची सगळी माहिती दिसेल.

मला सर्व सरकारी संकेतस्थळांची माहिती कोठे उपलब्ध होऊ शकेल याबाबत माहिती हवी आहे.  – संजय अवसरे

देशात ई-गव्‍‌र्हनन्सचा प्रभाव वाढत आहे. यामुळे सर्वच सरकारी विभागांची संकेतस्थळं उपलब्ध झाली आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारच्या संकेतस्थळांचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे तिकिटापासून इतर अनेक सेवा पुरविण्यासाठीही संकेतस्थळे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व संकेतस्थळांची लिंक तुम्हाला एकत्रित हवी असेल तर http://goidirectory.nic.in/index.php या संकेतस्थळाला भेट द्या. यावर तुम्हाला केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारांच्या विविध विभागांच्या सेवांची माहिती उपलब्ध होणार आहे. याशिवाय देशातील विविध न्यायालयांची माहितीही या संकेतस्थळावर तुम्हाला मिळू शकेल. राज्यनिहाय किंवा विभागनिहाय विभागणी केल्यामुळे पाहिजे ते संकेतस्थळ शोधणेही सोपे होणार आहे.

माझ्या मेमरी कार्डमधून डीसीआयएम फोल्डरमधील सर्व फोटो डिलीट झाले तरी बॅकअप कसा घ्यावा.  – दिनकर सावंत

अनेकदा हे फोटो तुमच्या मेमरीकार्डच्या तात्पुरत्या साठवणुकीत मिळू शकतात. यामुळे तुम्ही सर्वप्रथम एक नवीन फोटो काढून बघा. कदाचित नवीन डीसीआयएम फोल्डर तयार होईल आणि त्यात तुम्हाला कदाचित जुने फोटो मिळू शकतील. तसे नाही झाले तर एसडी कार्ड रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्या माध्यमातून तुम्हाला फोटो मिळवता येऊ शकतील. यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर डाऊनलोड केलेल्या संगणकातील कार्ड रीडरमध्ये कार्ड टाकून सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही कार्डातील फोटो मिळवू शकता.

तंत्रस्वामी