पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावामुळे जलसंकट गहिरे, मुंबईत आणखी कपातीची भीती

यंदा पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीतील पाणीसाठा कमालीचा आटला आहे. ही आपत्कालीन परिस्थिती ओळखून पाटबंधारे विभागाने तब्बल ४० टक्के पाणीकपातीचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे मुंबई-ठाणे आणि नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. मान्सूनच्या परतीच्या प्रवासात पुरेसा पाऊस न झाल्यास कोणत्याही क्षणी ही कपात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण व डोंबिवलीत आठवडय़ातून दोनदा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. सद्य:स्थितीत उपनगरांतील बहुतेक ठिकाणी आठवडय़ातून एक दिवस पाण्याची कपात लागू आहे. आता मुंबईतील पाणी कपातीमध्ये १० टक्क्य़ांची वाढ होण्याची शक्यता आहे.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
Slow redevelopment of slums in Mulund Bhandup Vikhroli and Ghatkopar
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ईशान्य मुंबईतील झोपडपट्ट्यांचा विकास संथगती
drowned
नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्य़ांत यंदा पावसाचे प्रमाण प्रचंड घटले आहे. दरवर्षी या भागात साधारणपणे ३००० मिलीमीटर इतका सरासरी पाऊस होतो. मात्र

 

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत यंदा सरासरीपेक्षा निम्मा पाऊसही झालेला नाही. ठाणे जिल्ह्य़ात विशेषत उल्हास नदी खोऱ्यातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर या महापालिकांना तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांना पाण्याचा पुरवठा होत असतो.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी, टाटा यांचे आंध्र तसेच मुंबई महापालिकेचे भातसा या धरणांचे मुख्य पाणीस्रोत उल्हास नदीचे खोरे आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्याने गेल्या वर्षी १ नोव्हेंबरपासून पाटबंधारे विभागाने १५ टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला.

त्यामुळे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांना जानेवारी महिन्यापासूनच आठवडय़ातून एक दिवस पाण्यावाचून राहावे लागत आहे. असे असताना गेल्या तीन महिन्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्याने ही कपात ४० टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने तयार केला असून, त्यामुळे शहर पातळीवर पाणी वितरण व्यवस्थेचे नियोजन तातडीने हाती घ्या, अशा सूचना या विभागाने संबंधित महापालिका आणि नगरपालिकांना दिल्या आहेत.

 

पुढील आठवडय़ात बैठक

दरम्यान पाटबंधारे विभागाचे पत्र मिळताच ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढील आठवडय़ात आपत्कालीन बैठकीचे आयोजन केले असून, पाणीपुरवठय़ाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

 

मुंबईच्या कपातीत आणखी १० टक्क्य़ांची भर?

मुंबई महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात आजमितीस जेमतेम ७० टक्के पाणीसाठा आहे. या धरणातून ठाणे महापालिकेस दररोज ५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असतो. मुंबई महापालिकेने मध्यंतरी पाणी कपात लागू केल्याने ठाण्याचे पाणीही कमी झाले होते. पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाचा फटका भातसा धरणातील पाणीपुरवठय़ालाही बसू शकतो. गुरुवारी सकाळी ६ वाजता घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार मुंबईकरांना पाणीपुरवठा  करणाऱ्या तलावांमध्ये ९,८१,७१६ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये १४,३१,७५३ दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध होता. येत्या काळात समाधानकारक पाऊस पडला तर पाणीकपातीचे संकट दूर होऊ शकते. मात्र तसे झाले नाही तर सप्टेंबरअखेरीस आढावा घेऊन मुंबईकरांच्या पाणीकपातीत आणखी १० टक्क्यांनी वाढ करावी लागेल, असे जल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत आंध्र धरणात ४२, बारवी धरणात ६६ तर मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात जेमतेम ७० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. हे प्रमाण अतिशय चिंताजनक असल्याने ४० टक्के पाणी कपातीस तयार राहा.

– पाटबंधारे विभागाने पाठवलेले पत्र

 

नवी मुंबईतही  विचार

पाटबंधारे विभागाने ४० टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव पुढे केल्याने नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, दिघा या उपनगरांच्या पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असले तरी नवी मुंबई महापालिका महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दररोज ६० दशलक्ष लिटर इतके पाणी विकत घेऊन ते या उपनगरांना वितरित करते. औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी कपात होण्याची चिन्हे असल्याने नवी मुंबईलाही त्याचा फटका बसणार आहे. तसेच खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मोरबे धरणात जेमतेम ५७ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. हे प्रमाण चिंताजनक असल्याने नवी मुंबई परिसरात कोणत्याही क्षणी पाणीकपात जाहीर करण्याचा विचार महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग करत आहे, अशी माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली. सद्य:स्थितीत नवी मुंबईत पाणीकपात लागू नसली तरी काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.