वसई-विरारमध्ये ध्वनिप्रदूषणविरोधी नियमांच्या उल्लंघनावरून कारवाई

गणेशोत्सवात उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी वसई-विरार महापालिका सज्ज झाली आहे. यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या, रस्ता अडविणाऱ्या मंडपांवर पोलिसांनी कारवाईस आरंभ केला आहे. याशिवाय शहरात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या सात मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गणेशोत्सवात मोठय़ा आवाजात डीजे वाजविण्यास बंदी असताना ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करून मोठय़ा आवाजात ध्वनिवर्धक सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी विरार, वालीव, तुळींज आणि अर्नाळा येथील चार गणेश मंडळांवर महाराष्ट्र ध्वनिप्रदूषण नियमन कायद्यानुसार कारवाई केली. यात ध्वनिवर्धक यंत्रणाही जप्त करण्यात आली आहे. ध्वनिवर्धक यंत्रणा वाजविण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मोठय़ा आवाजात डीजे लावून अशांतता निर्माण केल्याने ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गणेशोत्सवात करताना उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली होतीत्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश महापालिकांना दिले होते. गणेशोत्सव मंडपात, विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धकाच्या आवाजावर मर्यादा घालून दिली होती. तसेच कर्णकर्कश वाद्यांवर बंदी घातली होती. त्यानुसार पोलिसांनी गणेशोत्सवापूर्वीच हद्दीतील मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना या सूचना केल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन आल्याचे आढळून आले. वसई आणि विरारमधील सात मंडळांवर ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यावरून अधिनियम २००० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. त्यात विरार आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन, तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन मंडळांवर एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंडळवार विनापरवाना बॅण्डचा वापर केल्याप्रकरणी मुंबई पोलीस अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल झाल्याची वसईच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील यांनी दिली.

वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंडळावर परवानगी न घेता तसेच मोठा मंडप उभारून जागा अडविल्याप्रकरणी ३४१, १८८ अन्वये तसेच मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिरती पथके

आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वतीने एक फिरती पथके तयार करण्यात आली आहेत. ध्वनिमापक यंत्राद्वारे मोजणी करून ज्या मंडळांनी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले.

बेकायदा मंडप

वसई आणि विरार शहरांतील २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बेकायदा मंडप उभारले आहेत. या मंडळांविरोधात पालिकेने पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली. दोन्ही शहरांत मिळून एकूण ८२४ सार्वजनिक मंडळे आहेत. त्यापैकी ४४५ मंडळांनी पालिकेकडे रीतसर परवानगी घेतली आहे. यापैकी ४३७ मंडळांना पालिकेने परवानगी दिली आहे. यापैकी आठ मंडळांना परवानगी नाकारली होती. याशिवाय शहरातील २५ मंडळांनी परवानगी न घेता मंडप उभारले आहेत. या मंडळांविरोधात पालिकेने कारवाई करण्यासाठी पोलिसांना लेखी तक्रारी दिल्या आहेत. पालिकेकडून बेकायदा मंडप उभारणाऱ्यांविरोधात तक्रारी आल्या असून कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली.