२१ रस्ते नऊ मीटर रुंद करण्याचा निर्णय; पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर प्रस्ताव राज्य शासनाकडे

ठाणे : जुन्या ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात अडथळा ठरत असलेल्या रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव शासनस्तरावर वेगाने मार्गी लागावा यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या नौपाडय़ातील २१ रस्त्यांची रुंदी विकास आराखडय़ात नऊ मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. असे झाल्यास इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हस्तांतरण हक्काचा (टीडीआर) वापर करणे सोयीचे ठरणार आहे. या प्रस्तावावर आवश्यक असलेली हरकती सूचना मागविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सोमवारी सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास राज्य सरकारच्या मान्यतेसाठी तो पाठविला जाणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर, कळवा, मुंब्रा तसेच अन्य परिसरांत मोठी गृहसंकुले उभी राहात  आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती  असलेल्या नौपाडय़ातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्याचे चित्र आहे. इमारतीभोवती ९ मीटरचा रस्ता नसेल तर पुनर्विकासासाठी विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने नव्या टीडीआर धोरणात घेतली आहे.त्यामुळे  ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, उथळसर, कोलबाड, विष्णूनगर, बी-केबिन, चरई आणि राबोडी या भागांतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. या भागातील जुन्या इमारतींना टीडीआर मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे.  या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी  प्रशासनाने  २१ रस्ते ९ मीटरचे करण्याचा निर्णय घेतला आहे.  विकास आराखडय़ात ९ मीटरचे रस्ते दर्शविण्यासाठी  प्रस्ताव तयार केले आहेत. त्यास यापूर्वी सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांच्या हरकती आणि सूचना प्रशासनाने मागविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे  प्रक्रिया रखडली होती.

दरम्यान, निवडणूक झाल्यानंतर प्रशासनाने लगेच ही प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये १४ हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असून त्यावर पालिकेच्या सहायक संचालक नगररचनाकार यांनी सुनावणी घेऊन त्या निकाली काढल्या आहेत. त्यानंतर हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी सर्वसाधारण सभेपुढे यासंबंधीचा एक प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे.

पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होणार

रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्यास  ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, उथळसर, कोलबाड, विष्णूनगर, बी-केबिन, चरई आणि राबोडी या भागांतील रस्ते नऊ मीटरचे होणार असून येथील इमारतींचा रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

नव्या सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया वेगाने होत नसल्याबद्दल जुन्या शहरात नाराजीचा सूर होता. ठाणे शहराचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी या मुद्दय़ावर सातत्याने पाठपुरावा करूनही पाच वर्षांत महापालिका आणि शासनस्तरावर यासंबंधी फारशा हालचाली होत नसल्याच्या टीका केली जात होती. विधानसभा निवडणुकीतही या मुद्दय़ावरून राजकारण रंगले होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाचा कार्यभार असल्यामुळे यासंबंधीचा प्रस्ताव सरकारदरबारी गेल्यास सत्ताधारी शिवसेनेची या मुद्दय़ावर कसोटी लागणार आहे.