व्यायाम साहित्याची दुरवस्था; मद्यपींचे अड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे नाव घेऊन ठाणे महापालिकेतील सत्तेच्या पायऱ्या चढणाऱ्या शिवसेना नेत्यांचे धर्मवीरांच्या नावे उभारण्यात आलेल्या वास्तूंकडे मात्र दुर्लक्ष होत असून, काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत जोशी बेडेकर महाविद्यालयालगत उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचा अक्षरश: उकिरडा झाल्याने या भागातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठाणे शहरात मुळातच मोकळ्या जागांची वानवा आहे. त्यामुळे सकाळ, सायंकाळी तलावांच्या काठी फिरायला येणाऱ्या रहिवाशांचा आकडा बराच मोठा आहे. असे असताना शहरातील अनेक उद्यानांची दुरवस्था झाली असून दिवगंत आनंद दिघे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानात सर्रासपणे मद्यप्राशन तसेच गटाराचे पाणी सोडले जात असल्याने सत्ताधारी शिवसेनेचे नेते करतात तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच महानगरपालिकेचे धर्मवीर आनंद दिघेसाहेब उद्यान आहे. या उद्यानात सध्या मोडकळीस आलेले व्यायामाचे साहित्य आणि कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे लहान मुले, कॉलेज विद्यार्थ्यांचा एरवी राबता असलेले हे उद्यान सध्या ओस पडले आहे. या उद्यानाचे प्रवेशद्वार बंद करण्यात येत नसल्याने रात्रीच्या सुमारास हे ठिकाण तळीरामांचा अड्डा बनू लागले आहे. दिघेसाहेबांच्या नावे सुरू झालेल्या या उद्यानात पत्त्यांचे डाव, दारूच्या पाटर्य़ा झोडल्या जात असल्याने या भागातील जुन्या-जाणत्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र गुंडपुंडांचा अड्डा झालेल्या या उद्यानातील या झुंडशाहीला आवरायचे कुणी या विचाराने ही मंडळीही गप्प आहेत.

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच नागरिकांना विरंगुळ्यासाठी उद्यान आहे. बडय़ा उद्यानांसारखे या ठिकाणी पुरेपूर खेळण्याचे साहित्य उपलब्ध नसले तरी येथील व्यायामाचे साहित्यदेखील मोडकळीस आल्याचे चित्र आहे. उद्यानाच्या दोन्ही बाजूला प्लास्टिकचा कचरा साचला असून उद्यानाच्या जागेत पुरेशी मातीदेखील उपलब्ध राहिलेली नाही. या उद्यानात दारूच्या बाटल्या सर्वत्र पडलेल्या दिसतात. उद्यानाचे प्रवेशद्वारदेखील बंद करण्यात येत नसल्याने रस्त्यावरील भिकारी झोपण्यासाठी खुलेआम या उद्यानाचा वापर करतात. यासंबंधी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकारांची दखल घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.