पुस्तक दानातून वाचन-संस्कृतीचा पुरस्कार
सध्याच्या तांत्रिक युगात आपल्या नातवंडांना पुस्तकांचा सहवास लाभेल की नाही अशा विवंचनेत असलेल्या आजी-आजोबांनी त्यांच्यासाठी ग्रंथालय सुरू केले आहे. ठाण्यातील ‘प्रेस्टिज गार्डन’ येथील ज्येष्ठ नागरिकांनी हा उपक्रम राबवला असून सुमारे सातशे ते आठशे पुस्तकांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. परिसरातील शाळकरी मुले आजी-आजोबांनी उभारलेल्या या ग्रंथालयात दाखल होऊन दररोज वाचन आनंद घेत असतात. मुलांनी या ग्रंथालयाकडे यावे यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे ज्येष्ठ नागरिक लहानग्यांपासून तरुणांना ग्रंथालयाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
ठाण्यातील नितीन कंपनीजवळ असलेल्या प्रेस्टिज गार्डन या गृहसंकुलात वाचनाची आवड असणारे ज्येष्ठ नागरिक पुस्तकांची देवाणघेवाण करीत असत. एकमेकांना पुस्तकाची देवघेव करीत असताना या सगळ्या पुस्तकांचे ग्रंथालय झाल्यास त्याचा लाभ येथील ज्येष्ठ नागरिकांसोबत इतरांनाही होऊ शकतो, अशी कल्पना पुढे आली. येथील रहिवासी श्रीकांत सरवटे यांना ही ग्रंथालयाची संकल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी हा विषय इतर सहकाऱ्यांपुढे मांडला आणि त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या वसाहतीमधील ज्येष्ठ रहिवाशांनी एकत्र येऊन संकुलाच्या आवारात ग्रंथालय सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर या मंडळींनी एकत्र येऊन येथील गृहसंकुलातील इमारतींमध्ये पुस्तके दान करण्याचे आवाहन नोटीस फलकाच्या माध्यमातून केले. येथे राहणाऱ्या रहिवाशांनी वाचनीय असा पुस्तकांचा ठेवा ग्रंथालयासाठी दान दिला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या ग्रंथालयाचा शुभारंभ करण्यात आला. पुस्तके गोळा झाल्यानंतर ग्रंथालयासाठी त्यांना जागा उपलब्ध होत नव्हती. या सर्वानी मिळून संकुलाच्या पंप-हाऊसचा अर्धा भाग ग्रंथालय म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला.
ग्रंथालय आठवडय़ातील सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस वाचकांसाठी खुले असते, अशी माहिती संचालक मंडळाच्या शैलजा जोशी यांनी दिली. सध्या दान केलेल्या पुस्तकांसोबत काही नवी पुस्तकेही कालांतराने या ठिकाणी समावेश करण्याचा या मंडळींचा मानस आहे.
श्रीकांत सरवटे, अनिता परळीकर, ज्योती कुलकर्णी, रागिनी कारुळकर, एस. आर. लिमये, शैलाजा जोशी, आरती पांडे, रेश्मा देशपांडे आदी रहिवासी या ग्रंथालयाचे कामकाज पाहत आहेत.