विविध बँकांचे ५३ एटीएम कार्ड जप्त

विरार : एटीएम यंत्रातून पैसे कसे काढायचे हे माहीत नसलेल्या व्यक्तींना हेरून मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील एटीएम कार्डाचे अदलाबदल करणाऱ्या दुकलीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ५३ एटीएम कार्ड जप्त केली आहेत.

राजवीर भट्ट (वय ३३) आणि जितेंद्र तिवारी (३२) अशा या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोर्घ एटीएम केंद्राच्या बाहेर उभे राहून पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी सवांद साधत असत आणि त्यानंतर मोठय़ा शिताफीने एटीएम कार्डाची अदलाबदली करून त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास करत असत. या आरोपींनी शहरात धुमाकूळ घातला होता. दरम्यान, वसई फाटा येथील एटीएमजवळ दोघे जण संशयास्पद स्थितीत उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठत दोघा आरोपींना अटक केली. यामध्ये एटीएमची अदलाबदल करणाऱ्या टोळीचा म्होरक्या राजवीर भट्ट हाती लागला. या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. यामध्ये वालीव पोलीसा ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची टोळी आहे. ही टोळी शहरातील असंख्य एटीएमच्या बाहेर उभे राहून नागरिकांना मदत देण्याचे हेतूने आत घुसायचे. त्यांना मदत देण्याचा दिखावा करत एटीएम पिन जाणून घ्यायचे. त्यांनतर त्यांना बोलण्यात गुंतवून एटीएम कार्ड बदलायचे. नंतर बदललेल्या एटीएम कार्डमधून पैसे काढून गंडा घालायचे. हे आरोपी विशेषकरून वयोवृद्ध, महिला व लहान मुलांना पाहून असा गंडा घालण्याचा प्रयत्न करायचे.

एटीएम कार्ड अदलाबदल करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसानी अटक केली आहे. या आरोपीमधला राजवीर भट्ट हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने गुजरात ते मीरा रोड आणि वालीव परिसरात असंख्य गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून ५३ एटीएम ताब्यात घेतले आहेत. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

– विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस