करोनाच्या पाश्र्वभूमीवर शिक्षण विभागाकडून विलंब
वार्ताहर, लोकसत्ता
वसई : दरवर्षी जिल्हा शिक्षण विभागाकडून मे ते जून महिन्यांच्या दरम्यान जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येत असते. मात्र यंदा करोना महामारीच्या संकटामुळे अनधिकृत शाळांची यादी रखडली आहे. वसईतून अनधिकृत शाळांची माहितीसुद्धा शिक्षण विभागाला पोहचूनही यादी जाहीर न झाल्याने पालघर जिल्ह्य़ातील अनधिकृत शाळांचा प्रश्न अद्यापही कायम आहे.
वसई-विरार शहराच्या वाढत्या नागरीकरणासोबतच अनधिकृत शाळांचे जाळे वेगाने पसरू लागले आहे. त्यामुळे शहराच्या विविध ठिकाणच्या कानाकोपऱ्यात शिक्षण विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शाळा उभारल्या जात आहे. याला आळा घालण्यासाठी आणि पालकांची व विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक थांबण्यासाठी जिल्हा शिक्षण विभाग प्रत्येक वर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करते. परंतु यंदा करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरू होईल की नाही याबाबत शंका आहे. मात्र असे जरी असले तरी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जुलै महिना संपत आला तरी जाहीर न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील वर्षी मे २०१९ मध्ये यादी जाहीर केली होती. त्यात जिल्ह्यातील १९० शाळा अनधिकृत होत्या. त्यामध्ये सर्वाधिक १४९ शाळा वसई तालुक्यांतील असल्याचे निदर्शनास आले होते.
अनधिकृत शाळांची माहिती वर्ग
वसई-विरार शहरात नव्याने तयार होणाऱ्या अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व इतर कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे. तालुक्यात किती शाळा अजूनही अनधिकृत आहेत याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडे पाठवली असल्याची माहिती तालुका शिक्षण विभागाने दिली.
तालुक्यातील अनधिकृत शाळांचा आढावा घेऊन माहिती जिल्ह्याला पाठवून दिली आहे. अजून त्यावर निर्णय झाला नाही. तसेच आधीच्या ज्या अनधिकृत शाळा आहेत, त्यावरही कारवाईचे काम सुरूच आहे.
– माधवी तांडेल, गटशिक्षणाधिकारी, वसई तालुका