आशीष धनगर

कल्याण-अंबरनाथ मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामात तीन वर्षांपूर्वी बाधित झालेल्या उल्हासनगर शहरातील सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणाऱ्या छत्रपती शिवाजी चौक, फॉरवर लाइन चौक आणि सतरा सेक्शन चौक या तीन ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असून याच तीन किलोमीटरच्या रस्त्यावर १६० पथदिवेही बसविण्यात येणार आहेत. येत्या तीन महिन्यांत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.

कल्याण-कर्जत रस्त्याच्या रंदीकरणाचा प्रस्ताव मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. याच मार्गावरील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे कामही तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. याच रस्त्याचा तीन किलोमीटरचा मार्ग हा उल्हासनगर शहरातून जातो. तसेच जिल्ह्य़ातील प्रमुख व्यापारी केंद्र अशी ओळख असणाऱ्या शहरात मालवाहू गाडय़ांचा मोठा राबता असतो. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतूक शिस्तबद्ध होण्यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेतर्फे या भागात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या रस्तारुंदीकरणाच्या कामात ही सिग्नल यंत्रणा बाधित झाली होती. त्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी चौक, फॉरवर लाइन चौक आणि सतरा सेक्शन चौक या तीन ठिकाणी मालवाहू गाडय़ांमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली होती. शहरातील ही समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी चौक, फॉरवर लाइन चौक आणि सतरा सेक्शन चौक या तीन ठिकाणी लवकरच स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या ठिकाणी १६० नवीन पथदीप बसवण्यात येणार आहेत. या कामासाठी एकूण २ कोटी १६ लाख ७३ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.  कामे तीन महिन्यांत पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी सुटणार

उल्हासनगरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा फॉरवर लाइन हा चौक सर्वाधिक वर्दळीच्या चौकात मोडतो. त्यापुढील छत्रपती शिवाजी चौकही सर्वाधिक वर्दळीचा म्हणून ओळखला जातो. पुढील सतरा सेक्शन चौकातही अशीच काहीशी परिस्थिती असते. याच रस्त्यावर अवघ्या काही मीटरच्या अंतरात पाच चित्रपटगृहेही आहेत. या भागात स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसल्याने या भागातील वाहतूक कोंडी दूर होईल, शहरातील वाहतुकीलाही शिस्त लागेल, अशी अपेक्षा येथील स्थानिक व्यापारी व्यक्त करत आहेत.

उल्हासनगर शहरात मोठय़ा प्रमाणात मालवाहू वाहनांचा राबता असतो. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या चौकात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीत मालवाहू वाहने अडकल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होते. शहरात सिग्नल यंत्रणा बसविल्यास वाहतुकीला शिस्त लागेल आणि वाहतूक कोंडीही कमी होईल.

– राजेश कांबळे, स्थानिक व्यापारी