स्वागताध्यक्षपद न मिळाल्याने महापौरही नाराज

साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदावरून शिवसेना-भाजप दरम्यान प्रतिष्ठेची लढाई सुरू होण्यापूर्वीच पदनिवडीची घोषणा करून आयोजक मोकळे झाले असले तरी या सगळ्या प्रक्रियेमुळे शिवसेनेच्या वर्तुळात मात्र कमालीची अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाचा वाद संयोजन समितीने वझे यांच्या नावाची घोषणा करून संपविला खरा, मात्र या निर्णयामुळे महापौर राजेंद्र देवळेकर मात्र नाराज असल्याचे वृत्त आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या सभेला ते उशिराने आल्याने या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच संयोजन समितीच्या नेत्याने पालकमंत्र्यांना तरी विचारात घ्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी ‘लोकसत्ता ठाणे’सोबत बोलताना व्यक्त करत या नाराजीला अप्रत्यक्षपणे वाट मोकळी करून दिली.

डोंबिवलीत आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनाविषयी शहरातील मान्यवरांच्या सूचना जाणून घेण्यासाठी येथील सर्वेश सभागृहात रविवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य संमेलनावर कोणत्याही राजकीय पक्षाची छाप पडणार नाही असे समितीच्या वतीने वारंवार बोलले जात असले तरी पहिल्याच सभेला भाजपचे शहरातील मोठे नेते व्यासपीठावर अवतरल्याने या संमेलनावर भाजपचे वर्चस्व राहील, अशी चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या हंगामात २७ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून भाजपच्या तंबूत विसावलेले गुलाब वझे यांच्याकडे संमेलनाचे स्वागताध्यक्षपद आहे. त्यामुळे वझे यांच्या माध्यमातून भाजपचे नेते हे संमेलन ‘हायजॅक’ करण्याच्या तयारीला लागल्याचे येथील राजकीय वर्तुळात उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. आयोजनाच्या या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेनेचा एकही बडा नेता अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता. स्वागताध्यक्षपदाचा मान मिळाला नसल्याने महापौर राजेंद्र देवळेकर आयोजन समितीवर नाराज असल्याची चर्चा आहे.

रविवारी समितीच्या वतीने आयोजित सभेला राज्यमंत्री रवींद्र  चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही सभेला उपस्थित राहून आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले.

सभेला उपस्थित असलेल्या संस्थाचे प्रतिनिधीही भाजप तथा संघाशी निगडित असलेले दिसून येत होते. शिवसेनेचा एखाद दुसरा पदाधिकारी वगळला तर या बैठकीकडे सेना नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.

स्वागताध्यक्षपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. परंतु असे संमेलन आयोजित करताना अन्य शहरांमध्ये जी औपचारिकता आखली जाते त्याप्रमाणे येथेही व्हायला हवे होते या मताचा मी आहे. पण तसे झाले नाही याची खंत आहे. ठाणे शहरात ज्या दिमाखात नाटय़ संमेलन पार पडले त्याच जोशात  डोंबिवलीत साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाईल. परंतु संयोजन समितीने सगळ्यांना विचारात घेतले पाहिजे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली पाहिजे.

– महापौर राजेंद्र देवळेकर

रविवारच्या सभेला आम्ही सर्वाना निमंत्रित केले होते. त्यातही ती पहिलीच सभा होती. आम्ही पालकमंत्री तथा अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. सर्वाना विचारात घेऊन सर्वाच्या सहकार्याने संमेलन पार पाडण्याकडे आमचा कल असेल.

– गुलाब वझे, अध्यक्ष आगरी युथ फोरम