हनुमान मंदिर स्थलांतरित करण्यास व्यवस्थापन व पालिकेचे एकमत

डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकातील हनुमान मंदिर स्थलांतरित करण्याचा निर्णय अखेर मंदिर व्यवस्थान आणि महापालिका प्रशासनाने घेतला आहे. १९४० मध्ये उभारण्यात आलेले हे मंदिर वेळोवेळी झालेल्या रस्ते रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मध्यभागी आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या या चौकात नेहमी निर्माण होत होती.

बाजीप्रभू चौकात कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाचे आगार आहे. तसेच या भागात रिक्षाचे वाहनतळही आहे. येथेच फूल विक्रेते, फेरीवाले, भाजीविक्रेते बसलेले असतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा चौक कोंडीमय झाला आहे. याच वाटेत हनुमान मंदिर असल्याने ही कोंडी अधिक वाढते. येता-जाता वाटेत दर्शन घेता येत असल्याने हे मंदिर बाजीप्रभू चौकातून हटविण्यात येऊ नये, अशी भाविकांची मागणी होती. १९४० सालापासून अस्तित्वात असलेल्या या मंदिराचे नियंत्रण (पुजारी) दिनेश कुलकर्णी यांचे कुटुंबीय करीत आले आहे. १९७१ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराला चांगली पर्यायी जागा मिळाल्याशिवाय मंदिर न हटविण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता.

मंदिराला के. बी. विरा शाळेमागील महापालिकेच्या हजेरी शेडच्या जागेवर स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेतर्फे सुरू होता. ही जागा अडगळीत असल्याचे तसेच याच भागात स्वच्छतागृह असल्याने मंदिर व्यवस्थापनाने त्या ठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार दाखविला होता. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत हा विषय सर्वसाधारण सभेत चर्चेसही आला होता. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाचा बाजीप्रभू चौकात प्रतीक्षा कक्ष आहे. याच जागेवर मंदिर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर मंदिर व्यवस्थापन आणि महापालिकेचे एकमत झाल्याने स्थलांतरणाचा निर्णय पक्का करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. स्थलांतरित जागेत या मंदिराची दिशा पश्चिमेकडे असणार आहे. मंदिर व्यवस्थापन व भाविकांच्या मतांचा आदर करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पालिकेचे उपअभियंता प्रशांत भुजबळ यांनी सांगितले.

कोंडी सुटणार

डोंबिवली शहर होण्यापूर्वी हनुमान मंदिर बाजीप्रभू चौकात रस्त्याच्या कडेला होते. पालिकेतर्फे वेळोवेळी रस्ता रुंदीकरण करण्यात आले. त्या वेळी मंदिर रस्त्याच्या मधोमध आले. बाजीप्रभू चौकातून एमआयडीसी, २७ गावांच्यामध्ये बस सोडण्यात येतात. याच चौकात रिक्षा वाहनतळ आहे. याच चौकातून फडके रस्ता, नेहरू रस्ता, पाटकर रस्त्यावरून येणाऱ्या रिक्षा, वाहने ये-जा करीत असतात. चौकातील कोंडी सोडविण्यासाठी मंदिर स्थलांतरित करणे आवश्यक होते. परंतु, श्रद्धा आणि भावनेचा प्रश्न असल्याने, मंदिर स्थलांतर विषयावर कोणी काही बोलत नव्हते. मंदिर व्यवस्थापनाचे पुजारी कुलकर्णी, मागील ३५ वर्षे या मंदिरावर श्रद्धा असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थलांतराला अनुमती दिली आहे.

बाजीप्रभू चौकातील मंदिर स्थलांतरित केल्यामुळे चौकातील जागेचा बस, रिक्षा वाहनतळासाठी पुरेपूर उपयोग करता येईल. मंदिर हा श्रद्धेचा विषय असल्याने याबाबत विचारपूर्वक निर्णय होणे आवश्यक होते. मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा करून हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्यात आला आहे. मंदिर चौकातील समोरच्या बाजूत स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे रिक्षा, केडीएमटीच्या बस, या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला रस्त्याचा पुरेपूर वापर करणे शक्य होणार आहे.

प्रशांत भुजबळ उपअभियंता, डोंबिवली