कचरा न उचलता तक्रार सोडवल्याचा दावा

शहरात वा आसपासच्या भागात कुठेही कचरा दिसल्यास त्याचे छायाचित्र स्वच्छता अ‍ॅपवर टाका. तो कचरा उचलला जाईल, असे सांगितले जात असले तरी स्वच्छता अ‍ॅपवर केलेल्या कचऱ्याच्या तक्रारी न सोडवताच ती सोडवल्याचा खोटा खुलासा केल्याचे समोर आले आहे. एका तक्रारदाराने नेवाळी येथून जाणाऱ्या महामार्गाशेजारील कचऱ्याची तक्रार केली होती.

स्वच्छता अ‍ॅपवरील तक्रारींबाबतही अनेक तक्रारदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे अनेकदा दिसून आले. कुठेही कचरा दिसला तर त्याची तक्रार स्वच्छता अ‍ॅपवर करण्याचे आवाहन सरकारतर्फे केले जाते. अशाच प्रकारे काटई-बदलापूर महामार्गाशेजारी नेवाळीजवळ कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मधून देण्यात आले होते. काटई ते बदलापूर दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या वेशीवर असलेल्या बहुतेक गावांना कचराभूमी नसल्याने कचरा महामार्गाशेजारी टाकला जातो. त्यामुळे महामार्गाच्या सौंदर्यास बाधा येते.

यासंदर्भातील वृत्तानंतर एकाने याची तक्रार स्वच्छता अ‍ॅपवर टाकली होती. त्यानंतर ठाणे (एम कॉर्प)च्या वतीने ही तक्रार सोडवण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती तक्रारीवर देण्यात आली होती. मात्र चार दिवसांनंतरही तक्रारीवर काहीही न झाल्याने तक्रार कधी सोडवली जाईल, अशी प्रतिक्रिया तक्रारदाराने दिली. मात्र त्यानंतर काही तासातच तक्रार सुटली, असा शेरा देऊन तक्रार बंद करण्यात आली. मात्र महामार्गाशेजारील नेवाळीचा कचरा असलेल्या या भागात अद्याप कचरा उचलला गेलेला नाही. तक्रार सोडवणारी संस्था खोटा शेरा टाकून वेळ मारून नेत असल्याचेच समोर आले आहे. त्यामुळे स्वच्छता अ‍ॅपवरील तक्रारींवर देण्यात येणाऱ्या दिलासाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.