News Flash

सूरज परमार आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश

ठाण्यातील विकासक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ज्यांची नावे असतील, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा

चिठ्ठीतील सर्वावर गुन्हा दाखल करा!
ठाण्यातील विकासक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ज्यांची नावे असतील, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री दिले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत काही राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे आहेत, अशी चर्चा आहे. ही नावे खोडण्यात आल्याने पुढील तपासासाठी हे पत्र फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे. हा संदर्भही मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यात आला, त्यावर त्यांनी हे आदेश दिले.
परमार यांनी लिहिलेले २० पानी पत्र त्यांच्या कारमध्ये पोलिसांना सापडले होते. या पत्रात त्यांनी काही राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे लिहिली असून ती परमार यांनीच खोडली आहेत. ती शोधून काढण्यासाठी ठाणे पोलिसांनी राज्याबाहेरील फॉरेन्सिक लॅबमध्ये पत्र पाठविले आहे. या अहवालानंतरच या नावांचे गूढ उकलणार आहे. दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि काही विकासकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच परमार यांच्या आत्महत्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचीही मागणी केली. त्याचप्रमाणे पत्रात नावे असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. या वेळी राजकीय धोरणाचा त्रास होऊ नये म्हणून एक खिडकी योजना किंवा अन्य काही पर्याय असतील तर ते सुचवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी विकासकांना सांगितले.

बंदची हाक
सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात राजकीय धोरणांविषयी आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे त्याचा निषेध नोंदविण्यासाठी ठाणे एमसीएचआयच्या वतीने मंगळवारी काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 3:34 am

Web Title: cm order about suraj parmar case
Next Stories
1 वीज तारेच्या स्पर्शाने शहापुरात तिघांचा मृत्यू
2 बिबटय़ाच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
3 सत्तेसाठी युद्धही घडवतील!
Just Now!
X