News Flash

कळव्यात सांडपाण्यावरील भाजीमळय़ांना पुन्हा बहर

मफतलाल तलावातील दूषित पाण्याचा भाजी धुण्यासाठी वापर; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच

मफतलाल तलावातील दूषित पाण्याचा भाजी धुण्यासाठी वापर; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : ठाणे महापालिकेने दोन महिन्यांपूर्वीच सांडपाण्याचा वापर करून पिकवण्यात येणाऱ्या भाजीपाल्यांच्या मळ्यांवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला होता. असे असले तरी महापालिकेच्या या कारवाईत खंड पडल्याने कळव्यातील मफतलाल परिसरात पुन्हा सांडपाण्याचा वापर करून भाजीपाल्याचे मळे फुललेले पाहायला मिळत आहेत. तसेच या मळ्यात पिकणाऱ्या पालेभाज्या धुण्यासाठी मफतलाल तलावातील दूषित पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे शहरात रेल्वे रुळाशेजारी तसेच खुल्या जागेत पालेभाज्या पिकविण्यासाठी नाल्यातील सांडपाणी वापरले जात असल्याची बाब सातत्याने पुढे येत आहे. दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची बाब खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर सावध झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी एक विशेष बैठक घेतली होती. त्यावेळी अशी शेती करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी दिले होते.  त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे भाजीमळे उद्ध्वस्त केले होते.

असे असले तरी अवघ्या दोन महिन्यात महापालिका प्रशासनाच्या या कारवाईत खंड पडला आहे. त्यामुळे कळव्यातील मफतलाल परिसरात सांडपाण्याच्या साहाय्याने पिकवले जाणारे हे भाजीमळे पुन्हा फुलले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कळव्यातील मफतलाल परिसरात तलाव असून या तलावातील पाण्याचा वापर हा अनेक जण आंघोळीसाठी तसेच कपडे धुण्यासाठी करतात. तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या घराचे सांडपाणीही या तलावात सोडल्याचे दिसून येते. त्यामुळे या तलावाचे पाणी दूषित झाले असून पाण्याला दुर्गंध येत आहे. त्यातच मफतलाल परिसरात सांडपाण्याचा वापर करून पिकणारा भाजीपाला धुण्यासाठी या दूषित पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 3:27 am

Web Title: contaminated water in mafatlal lake use to wash the vegetables zws 70
Next Stories
1 बाजार थंडावले; एसटीलाही फटका
2 पत्नीची हत्याकरुन आत्महत्या केल्याचा बनाव
3 करोनामुळे देश-विदेशातील सहली स्थगित
Just Now!
X