भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला, ठेकेदाराचे देयक थकविल्याचा परिणाम

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे, पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्याचे काम करणाऱ्या प्राणी मित्र संस्थेच्या कामाचे देयक महापालिकेने गेल्या सात महिन्यापासून थकविले आहे. पैसे थकविल्यामुळे संस्थेत काम करणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होत नसल्याने शहरातील श्वान निर्बीजीकरणाचे काम थांबले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे संबंधित संस्थेचे देयक  थकविण्यात आल्याचे वृत्त असून यामुळे शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

कल्याणमधील पत्रीपुलाजवळील कत्तलखान्याजवळ महापालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. या केंद्राचे काम मागील अडीच वर्षांपासून हैदराबाद येथील ‘व्हेट फॉर अ‍ॅनिमल’ संस्था पाहाते. श्वानांचे निर्बीजीकरण करणे आणि भटकी, पिसाळलेले श्वान पकडून आणून त्यांचे संगोपन करणे हे काम ही संस्था करते. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील भटके श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. यासाठी महापालिकेकडून संबंधित संस्थेस देयक अदा केले जाते. असे असताना महापालिकेने या संस्थेचे सुमारे ४२ ते ४५ लाख रुपयांचे देयक तिजोरीत पैसे नाहीत म्हणून गेल्या सात महिन्यापासून थकविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देयकांची रक्कम मिळाली नसल्याने केंद्रात उपचारासाठी जेवढे श्वान आहेत त्यांना बाहेर सोडण्याचे काम पूर्ण होताच हे काम थांबविले जाईल, असा इशारा संबंधित संस्थेने दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय सद्यस्थितीत नव्याने श्वान पकडून आणणे आणि त्यांच्यावर निर्बीजीकरण करणे ही प्रक्रिया थांबिवण्यात आली आहे. वैद्यकीय आरोग्य विभागातील अधिकारी लवकरच देयक काढण्यात येईल, असे आश्वासन देत आहेत.

पण, प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याचे सांगितले जाते. संस्थेबरोबरचा पालिकेचा करार येत्या दोन महिन्यात संपणार आहे. त्यामुळे संस्थेचा करार नूतनीकरण करा यासाठी संस्था पालिकेकडे प्रयत्नशील आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारे करार नूतनीकरण न करता, निविदा प्रक्रियेद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे संस्थेला सांगण्यात येत आहे.

कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणाऱ्या संस्थेचे देयक देण्यात यावे यासाठी आयुक्तांना कळविण्यात आले आहे. जानेवारीपासूनची देयक थकीत आहेत. संस्थेने काम थांबविलेले नाही. तसे लेखी पत्र आपल्यापर्यंत आलेले नाही.

-डॉ. स्मिता रोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कडोंमपा