|| सुहास बिऱ्हाडे

केवळ १० कोटी खर्च; सर्वात कमी खर्च करणारी  वसई-विरार महापालिका असल्याचा प्रशासनाचा दावा

वसई:  करोनाच्या काळात इतर महापालिकांकडून वारेमाप खर्च होत असताना वसई-विरार महापालिकेने मात्र सर्वात कमी खर्च करून परिणामकारक उपाययोजनेद्वारे करोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले आहे.  मागील सहा महिन्यांत पालिकेचे अवघे १० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

राज्यात मार्च महिन्यात करोनाने शिरकाव केला होता. वसई-विरार शहरात १३ मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पालिकेने करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मात्र ते करताना कुठेही अतिरिक्त खर्च होणार नाही, यावर पालिकेने भर दिला. त्यासाठी कुठल्याही बाह्ययंत्रणेला काम  न देता केवळ पालिके ची यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाचा वापर केला. यामुळे करोना नियंत्रणात आला आहे. पालिकेचे अवघे १० कोटी रुपये खर्च झाले आहेत.  त्यामुळे पालिकेने शासनाकडे १५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मागण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे शासनाकडे सर्वात कमी अनुदान मागणारी मुंबई महानगर क्षेत्रातील वसई-विरार ही एकमेव महापालिका ठरली आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

शहरात स्वयंचलित वाहनाद्वारे निर्जंतुकीकरण केले जात होते. त्याचा महिन्याचा खर्च हा सात कोटी रुपये होता. मात्र हा खर्च अनावश्यक असल्याचे लक्षात आल्याने आयुक्त गंगाथरन डी. यांनी हा ठेका रद्द केला. त्याऐवजी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सायकली दिल्या. हे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी जाऊन औषध फवारणी करून परिसर निर्जंतूक करत होते.

पालिका कर्मचाऱ्यांकडून सेवा

करोनाच्या निवारणासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यासाठी नव्याने ठेका पद्धतीने कर्मचारी तैनात करावे लागणार होते. मात्र पालिका आय़ुक्तांनी पालिकेच्या मुख्यालयात काम करणारी कर्मचारी यंत्रणा सेवेत आणली.  पालिकेचे अनेक ४०० हून अधिक कायम सेवेतील कर्मचारी अनावश्यक ठिकाणी काम करत होते. अनेक सफाई कर्मचारी लिपिक म्हणून काम करत होते. त्या सर्वांना  करोना उपचार केंद्रात आणि इतर मोहिमेवर पाठविले.  त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा खर्च वाचला.

कायमस्वरूपी आरोग्य यंत्रणा

इतर महापालिकांनी तात्पुरते करोना उपचार केंद्रे उभारली आणि त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र पालिकेने  केंद्र उभारताना त्याचा कायमस्वरूपी वापर होईल याचा विचार केला.

त्यासाठी चंदनसार येथील पालिकेच्या इमारतीत स्वंयसेवी संस्थेच्या मदतीने रुग्णालय उभारले. अत्याधुनिक यंत्रणा आणली. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च आला. वसई पूर्वेला असलेल्या वरुण इंडस्ट्रीमध्ये करोना उपचार केंद्रे उभारले. ही इमारत तयार असल्याने पालिकेला बांधकामाचा खर्च करावा लागला नाही. केवळ दीड कोटी रुपये खर्च करून पालिकेने तिथे सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. हे केंद्र पालिकेने वर्षभरासाठी घेतले आहे.

कॉल सेंटर नाही

करोनाच्या काळात सर्व महापालिकेने बाह्ययंत्रणेकडून (आऊटसोर्सिंग) उभारले गेले होते. परंतु वसई-विरार महापालिकेने कॉल सेंटर न उभारता पालिकेची यंत्रणा तयार करून जनजागृती आणि माहिती देण्याचे काम सुरू केले. त्यामुळे मोठी आर्थिक बचत  झाली.

 

आम्ही पालिकेच्याच यंत्रणेचा पुरेपूर वापर केला आणि त्याचा सकारात्मक परिणाम मिळाला. बाहेरून मनुष्यबळ न घेता पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा या कामासाठी वापर केला. अनावश्यक खर्चाला  कात्री लावली. करोनाउपचार केंद्रेदेखील तयार वास्तूमध्ये उभारले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत झाली. -गंगाथरन डी.,आयुक्त, वसई विरार महापालिका