23 October 2020

News Flash

खाटा रिकाम्या तरीही दमछाक

लोकप्रतिनिधी, काही महत्त्वाच्या व्यक्तींकडून खाटा राखीव ठेवण्यासाठी दबाव

लोकप्रतिनिधी, काही महत्त्वाच्या व्यक्तींकडून खाटा राखीव ठेवण्यासाठी दबाव

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोंबिवली आणि भिवंडीतील करोना रुग्णालयांमध्ये सुमारे तीन हजार खाटा उपलब्ध असून  तरीही या रुग्णालयामध्ये प्रवेश मिळविताना सामान्य रुग्णांची दमछाक होत  आहे.  मात्र, महत्वाच्या रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवल्या जात असून लोकप्रतिनिधी, नेतेमंडळींकडून त्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे.

डोंबिवली पूर्व भागात दररोज १५० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून पालिका कर्मचारी डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयाने शिफारस केल्याप्रमाणे सावळाराम महाराज क्रीडासंकुल, पाटीदार भवन, डोंबिवली जीमखाना किंवा भिवंडी जवळील टाटा आमंत्रा केंद्रात करोना रुग्ण दाखल केले जातात.  मात्र, तेथे   तपासल्यानंतर रुग्णाला अनेकदा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते अशा तक्रारी आहेत.

मागच्या आठवडय़ात ऑक्सिजन पातळी खाली असलेल्या करोना रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी कर्मचारी सावळाराम महाराज क्रीडासंकुलात गेले. त्या रुग्णाला तपासल्यानंतर तेथील डॉक्टरांनी ‘या रुग्णाला आम्ही येथे दाखल करून घेऊ शकत नाही’ असे उत्तर दिले. अखेर अर्धा तासाच्या वादावादीनंतर त्या रुग्णाला सावळाराम महाराजमधील रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. दुसऱ्या एका प्रकरणात ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णाला घेऊन रुग्णाचे नातेवाईक पहाटे तीन वाजता सावळराम महाराज रुग्णालयात घेऊन गेले होते.   शिफारसपत्र देऊनही तेथे त्याला दाखल करून घेतले जात नव्हते. अशावेळी या रुग्णालयांवर नियंत्रक असलेले वैद्यकीय अधिकारी खासगी रुग्णालयांची बाजू घेऊन रुग्णाला खासगी रुग्णालयात जाण्यासाठी सुचवत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

अलगीकरण कक्ष रिकामे

करोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन डोंबिवली पश्चिमेत स. है. जोंधळे विद्यालयात २२५ खाटांचा अलगीकरण कक्ष दीड महिन्यापूर्वी उघडण्यात आला.   अद्याप हे केंद्र सुरू झालेले नाही. या केंद्रात प्रतिजन चाचण्या, तापाचा दवाखाना सुरू आहे. अशाच पद्धतीने कल्याणमधील शहाड येथे एन. आर. सी. शाळेत २०० खाटांचे अलगीकरण केंद्र तयार करण्यात आले. तेही ओस आहे. याच भागात साई निर्वाणा इमारतीत अलगीकरण केंद्र आहे. तेथेही करोना लक्षणे असलेल्या रुग्णांची तुरळक उपस्थिती असते. टाटा आमंत्रा प्रकल्पात करोना संशयित रुग्णांसाठी ४९९ खाटा आहेत. अलगीकरणासाठी रहिवासी पालिकेच्या केंद्रात जाण्याऐवजी घरात राहण्यास प्राधान्य देत असल्याने पालिकेची केंद्रे ओस आहेत. नवीन केंद्रे सुरू केली तर तेथे डॉक्टर, खाद्यखाना, कर्मचारी नियुक्त करावे लागतात. त्यामुळे आहे ती केंद्रे चालविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.दरम्यान, डोंबिवलीतील लोकप्रतिनिधी, काही महत्त्वाच्या व्यक्ती आपल्या करोनाबाधित आप्त, नातेवाईक, कार्यकर्त्यांना दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयांवर दबाव आणतात. दाखल करून घेतले नाही तर त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पालिकेला अंधारात ठेवून परस्पर शहराबाहेरील करोना रुग्ण दाखल करून घेत असल्याच्या तक्रारी आहेत.

पालिका नियंत्रित करोना रुग्णालये

’  रिजन्सी गृहसंकुल, पाटीदार भवन : एकूण खाटा २१०. रुग्णांनी भरलेल्या खाटा १९५

’ सावळाराम महाराज क्रीडासंकुल, घरडा सर्कल : एकूण खाटा १५७. रुग्णांनी भरलेल्या खाटा १३०

’ डोंबिवली जीमखाना : अतिदक्षता विभागाच्या ७० खाटा. त्यामधील ५२ भरलेल्या.

’ टाटा आमंत्रा (भिवंडी) :  सकारात्मक रुग्णांसाठी एकूण १९४० खाटा. त्यामधील १७९८ भरलेल्या अलगीकरणासाठी ४९० खाटा. त्यामधील ५० भरलेल्या.

करोना रुग्णांच्या आजाराच्या परिस्थितीनुसार त्यांना करोना रुग्णालय, काळजी केंद्रात दाखल केले जाते. करोनाची लक्षणे असलेले संशयित, बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चांगल्यापैकी आहे. त्यामुळे खाटा रिकाम्या दिसत असल्या तरी दिवसभरात आढळणारे रुग्ण त्या खाटांवर दाखल केले जातात.

-डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:43 am

Web Title: covid patients in kalyan dombivali not getting bed despite of available zws 70
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीत घरकामगारांची उपासमार
2 महापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा
3 करोना चाचणीला नागरिकांचा विरोध
Just Now!
X