वसई-विरारमध्ये साथीच्या आजारांचे थैमान; पालिकेकडून उपायांची नागरिकांना अपेक्षा

वसई-विरार शहरात विविध आजारांनी थैमान घातले असून डेंग्यूचा प्रादूर्भाव झाला आहे. आठवडय़ाभरात शहरातील दोन महिलांचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेने मात्र डेंग्यूच्या प्रादूर्भावावर नियंत्रण मिळविल्याचा दावा केला आहे.

पावसानंतर वसई-विरार शहरात विविध रोगांनी थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेले अनेक रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत दाखल झाले आहेत. त्यातील दोन महिलांचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. विरार पश्चिमेकडील बोळींज येथील प्रमिला वासुदेव नाईक (६४) या महिलेस ताप आल्याने त्यांना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारांनी फरक पडत नसल्यामुळे त्यांना अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तरीही फरक पडत नसल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये प्रमिला यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. याच दिवशी विजय वल्लभ रुग्णालयात वंदन प्रेमनाथ पाटील (३५) या महिलेचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला. वंदना हिला मंगळवारी पहाटे तीन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे हे मृत्यू झाल्याचा संताप शहरात व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. यानंतर महापालिकेने बोळींजसह इतर भागांत ताबडतोब स्वच्छता मोहीम सुरू करून औषध आणि जंतुनाशक पावडर फवारणी केली. पावसाळ्यात जीवघेणे रोग बळावण्याचा धोका असताना महापालिकेने वेळीच प्रतिबंधात्मक उपाय आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे होते. मात्र, या पातळीवर महापालिका ढिम्म राहिली, असा संताप परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

‘मृत्यू डेंग्यूने नाही’

दरम्यान, सदरचे मृत्यू डेंग्यूमुळे झालेले नसून उलट गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूवर नियंत्रण आणण्यास यावर्षी महापालिका प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले आहे, असा दावा महापालिका नियुक्त वेक्टर डिसिज कंट्रोलचे व्यवस्थापक सचिन शेट्टी यांनी केला आहे. डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी महापालिकेने खास पथक तयार केले असून यामध्ये महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. कर्मचाऱ्यांना डेंग्यूचा डास कसा ओळखायचा यासह एकूणच डेंग्यूबाबत खास प्रशिक्षण दिले आहे. डेंग्यूची निर्मिती गटारात वा दूषित पाण्यात होत नाही. हे डास साठलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. साधारणत: जुलै ते ऑक्टोबर हा डेंग्यूच्या डासांचा प्रजनन काळ असतो. या काळात आमचे पथक सर्व प्रभागांत जाऊन डेंग्यूबाबत चाचपणी करत आहे. ज्या ठिकाणी आम्हाला डेंग्यूचा उद्भव झाल्याचे सांगण्यात येते तेथे आम्ही सतत तीन दिवस जाऊन त्या परिसरातील जवळपास १५० घरांची पाहणी करून त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो. यावर्षी आम्हाला कुठेही डेंग्यूचा उद्भव आढळून आला नाही, अशी माहितीही शेट्टी यांनी दिली.

वसई-विरार शहर महापालिकेच्या विविध प्रभागांत स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे रोगराई पसरत आहे. आताच्या दुर्दैवी घटनेनंतर महापालिकेने रोग निर्मूलन आणि रोगप्रतिबंधक उपाय सुरू केले असले तरी केवळ तात्पुरतेच असता कामा नये. महापालिकेने सर्व प्रभागांत नियमितपणे औषध फवारणी करणे गरजेचे आहे. – प्रथमेश कदम, स्थानिक