08 August 2020

News Flash

शहरबात-ठाणे : ठाण्याच्या विकासाला पर्यटनाचे कोंदण

मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्य़ास निसर्ग सौदर्याची फार मोठी देणगी लाभलेली आहे.

मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे जानेवारी महिन्यात भरणाऱ्या जत्रेलाही अनेक पर्यटक येत असतात.    

महाराष्ट्रातील बहुतेक वनपट्टे आता उजाड होत असले तरी ठाणे जिल्ह्य़ातील येऊरपासून मुरबाडपर्यंतची जंगलसंपदा बऱ्यापैकी टिकून आहे. विशेष करून माळशेज घाट, बारवीचे जंगल, माथेरान डोंगरपट्टीतील हिरवा निसर्ग पर्यटकांना खुणावतो. या भागात पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. आता उशिराने का होईना पण त्या दृष्टीने विचार सुरू झाला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते आदी शासनाच्या विविध शाखा समन्वयाने काम करताना दिसत आहेत.

मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्य़ास निसर्ग सौदर्याची फार मोठी देणगी लाभलेली आहे. अगदी बाराही महिने या भागातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणे पर्यटकांच्या दृष्टीने पर्वणी असली तरी पावसाळ्यातील आनंद काही और असतो. सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमधून मुक्तपणे कोसळणाऱ्या धबधब्यांखाली डुंबणे अनेकांना आवडते. त्यामुळे  वर्षांऋतूतील सर्व शनिवार-रविवारी येथे पर्यटकांची रीघ लागलेली असते. त्यांचा उत्साह इतका टिपेला असतो, की यंदा त्यांना काहीसा आवर घालावा लागला. श्रावणपूर्व वीकेंडला माळशेज तसेच कोंडेश्वरसारखी ठिकाणे पर्यटकांसाठी चक्क बंद करण्यात आली होती.

गेल्या काही वर्षांत मात्र वनविभाग, पर्यटन विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी येथील पर्यटनस्थळांचा विकास करण्याचे काम सुरू आहे. त्यातून पारंपरिक पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा दिल्या जाऊ लागल्या आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांचा विकास साधणे, हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे.

ठाणे जिल्ह्य़ाच्या वेशीवर असलेला कल्याण-नगर मार्गावरील माळशेज घाट हे पावसाळी पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र. मात्र माथेरानप्रमाणेच या घाटात ठिकठिकाणी पॉइंट विकसित करून त्याला बारमाही पर्यटनाचे केंद्र बनविले जात आहे. वन विभागाने माळशेजच्या पायथ्याशी थितबी येथे नवे पर्यटन ग्राम विकसित केले आहे. इथूनच कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारी जुनी वाट आहे. याच माळरानावर पावसाळ्यानंतर रानफुलांचा बहर येतो. इथे ‘कास’च्या पठारासारखे पर्यटनस्थळ विकसित करणे शक्य आहे. वन विभाग त्या दृष्टीने विचार करीत आहे. माळशेजच्या माथ्यावर पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांच्या निवासासाठी अत्याधुनिक निवास व्यवस्था तयार केली आहे. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान रायगड जिल्ह्य़ात असले तरी मुंबई-ठाण्यातील पर्यटकांच्या सोयीचे आहे. मध्य रेल्वेवरील नेरळ स्थानकात उतरून इथे जाता येते. श्रीमलंग डोंगररारांमध्ये शासनाच्या वतीने बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सुरू होत आहे. डोंगरावरील रेल्वेचा हा प्रकल्प बराचकाळ रेंगाळला. आता नव्याने दिलेल्या मुदतीनुसार पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ही रेल्वे धावू शकेल, असे बोलले जाते. माळशेज, माथेराननंतर श्रीमलंग गडावर घेऊन जाणारी फ्युनिक्युलर पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे. तानसा अभयारण्य, मुरबाडमधील जैवविविधता असलेली वनसंपदा, बारवीचे जंगल, अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर, टिटवाळा येथील महागणपतीचे मंदिर, शहाड येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलाचे मंदिर अशी पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरतील, अशी अनेक ठिकाणे या भागात आहेत. मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे जानेवारी महिन्यात भरणाऱ्या जत्रेलाही अनेक पर्यटक येत असतात.

अशारितीने जिल्ह्य़ातील पावसाळी पर्यटन, खाडीपर्यटन, वनपर्यटन, धार्मिक पर्यटन अशा वेगवेगळ्या पातळीवर ठाणे जिल्ह्य़ाचा पर्यटन विकास होत असून प्रशासन यंत्रणा, स्थानिक नागरिक, पर्यावरण संस्था, वनविभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून पर्यटकांसाठी चांगली स्थळे विकसित केली जाऊ लागली आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आठ कोटींचा निधी खर्च करण्यात येत असल्याने हे ठिकाण पर्यटकांसाठी कायमच खुणावणार असेल.

ग्रामपर्यटनातून रोजगार संधी

माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या थितबी या आदिवासी गावात सुरू झालेले पर्यटन केंद्र या भागातील स्थानिकांसाठी विशेष महत्त्वाचे आहे. वन विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘थितबी’ पर्यटन ग्राम प्रकल्पामुळे आता पर्यटकांना अधिक सुरक्षितपणे माळशेजच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येणार आहे. थितबी या पर्यटनस्थळी पर्यटकांच्या निवासासाठी स्वतंत्र कक्ष, सामूहिक कक्ष, सभा-संमेलनांसाठी सभागृह, तंबूनिवास तसेच स्वयंपाकघराची व्यवस्था वनविभागातर्फेच करण्यात आल्याने ठाण्यातील पर्यटनाला वाव मिळावा यासाठी शासनाकडून केले जाणारे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. या पर्यटन व्यवसायात ग्रामसमित्यांनादेखील सहभागी करून घेणार असल्याने अशा प्रकारचा विकास होणारे थितबी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले पर्यटनस्थळ आहे. अशा प्रकारच्या सुविधा अन्य ठिकाणीही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रकल्पाच्या व्यवस्थापनात स्थानिकांचा सहभाग असल्याने त्यांना फार मोठय़ा व्यवसाय संधी मिळू शकणार आहेत.

सुरक्षा आणि ताण

मुरबाड, माळशेज घाट, भिवपुरी या ठिकाणच्या निसर्गरम्य धबधब्यांमुळे पर्यटक मोठय़ा प्रमाणात या पर्यटनस्थळांकडे दाखल होत असले तरी या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुविधांची आवश्यकता आहे. पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पर्यटक या ठिकाणी दाखल होत असल्याने लोकल रेल्वेवरही त्याचा ताण पडतो. याशिवाय या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने ही वाहतूक कोंडी आटोक्यात आणणे हे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. पर्यटकांची सुरक्षा या पाश्र्वभूमीवर यंदा कोंडेश्वर आणि माळशेज ही पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

एकंदरीतच शासनाचा वनविभाग, प्रशासनयंत्रणा, स्थानिक नागरिक, पर्यावरण संस्था आणि अर्थातच पर्यटक यांच्या एकत्रित सहभागातून ठाणे जिल्ह्याचे पर्यटन अधिक आकर्षण ठरणार आहे.

खाडी पर्यटनाचे विशेष आकर्षण

खाडीकिनारी पक्षीनिरीक्षणासाठी पर्यटक, पक्षी अभ्यासकांचा ओढा वाढत असताना या ठिकाणी शासनाच्या कांदळवन विभागातर्फे स्थानिक कोळ्यांना एकत्रित करून खाडी पर्यटन सुरू करण्यात येत आहे. पार्टीसिपेटरी ईको टूरिझम प्लॅन रुल्स अ‍ॅण्ड रेग्युलेशन या योजनेच्या अंतर्गत परिसरातील स्थानिक कोळ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून त्या निमित्ताने कोळ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनातर्फे करण्यात येत असल्याने ठाणे, नवी मुंबईच्या खाडी किनारी जैवविविधता अनुभवण्यासाठी खाडी पर्यटन पर्यटकांसाठी खुले होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2017 1:35 am

Web Title: development of tourist place in thane
Next Stories
1 जीएसटीमुळे वाद्यांचेही ‘ढोल वाजले’
2 शहरबात-वसई : पर्यटकांच्या हुल्लडबाजीने पावित्र्यावर घाला
3 वसईतील ख्रिस्तायण : वसईतील बोलीभाषा
Just Now!
X