प्रकरणाचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचल्याने पुरावे गोळा करण्यात पोलिसांची दमछाक
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इफेड्रिन’ पावडरच्या तस्करीचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचल्याने याप्रकरणी पुरावे गोळे करताना पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे. सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीतून थेट परदेशात इफेड्रिन पावडर पोहोचविणाऱ्या माफियांची मधली साखळी अजूनही पोलिसांच्या हाती लागली नाही. त्यामुळे ही पावडर परदेशात कशी जात होती, याविषयी पोलिसांना समजू शकलेले नाही.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ‘इफेड्रिन’ पावडरच्या प्रकरणात एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी चारजणांना अटक झाली होती. तसेच या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर इफेड्रिन तस्करमध्ये सोलापूर जिल्ह्य़ातील एव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीतील मुख्य संचालक मनोज जैन याचा सहभाग असल्याची बाब पुढे येताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याशिवाय, कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या पुनीत श्रींगी, धानेश्वर स्वामी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला इफेड्रिन पावडरची तस्करी गुजरातपुरतीच असल्याचे समोर आले होते, मात्र सखोल तपासादरम्यान हि तस्करी परदेशापर्यंत पोहोचल्याचे समोर आले. मनोज जैन तसेच अधिकारी पुनीत श्रींगी यांनी केनिया, दुबई आणि युरोपमधील काही देशांना भेटी दिल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. तसेच परदेशात कुख्यात आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी याच्यासोबत त्यांची अनेकदा भेट झाल्याचे आणि या भेटीदरम्यान नशेसाठी कंपनीतून इफेड्रिन पुरविण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजित कामत व संचालक राजेंद्र कैमल यांच्याकडे ठाणे पोलीस इफेड्रिन तस्करीसंबंधी गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू होती. मात्र त्यामध्ये त्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून आलेला नाही. तसेच या प्रकरणाबाबत दोघेही अनभिज्ञ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात दोघांनाही क्लिनचिट मिळण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.