31 May 2020

News Flash

मासळी महाग

ठाणे, मुंबई, तसेच पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्टपासून मासेमारीचा हंगामा सुरू होतो आणि ऑक्टोबरनंतर चांगल्या प्रकारे मासे मिळायला सुरुवात होते.

(संग्रहित छायाचित्र)

|| पूर्वा साडविलकर

मत्स्यपुरवठय़ात ६० टक्क्यांपर्यंत घट; माशांच्या दरांत ३० टक्क्यांची वाढ : – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळामुळे सतर्कता म्हणून कुलाबा, पालघर, डहाणू, वसई यांसारख्या भागांमध्ये समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याने याचा थेट फटका मासेमारी उत्पादनाला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात माशांची आवक घटल्यामुळे किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.  माशांच्या पुरवठय़ात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

ठाणे, मुंबई, तसेच पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्टपासून मासेमारीचा हंगामा सुरू होतो आणि ऑक्टोबरनंतर चांगल्या प्रकारे मासे मिळायला सुरुवात होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मासे उत्पादनावर झालेला पाहायला मिळत आहे. ठाणे तसेच आसपासच्या शहरात माशांची आवक ही कुलाबा आणि भाऊच्या धक्क्याहून होत असते. गेल्या काही दिवसांपासून या पुरवठय़ात घट झाल्याने माशांच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. हिवाळ्याच्या दिवसात माशांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. सद्य:स्थितीत बाजारात मागणीप्रमाणे माशांची आवक होत नसल्याने त्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे मासळी विक्रेत्यांनी सांगितले.

ऑक्टोबर महिन्यात १५० रुपये किलो या दराने मिळणारे बोंबिल सद्य:स्थितीला २०० रुपये किलोने मिळत आहे. तर, ४०० रुपये किलोने मिळणारी कोळंबी सद्य:स्थितीला ५०० रुपये किलोने मिळत आहेत. पापलेट आकारानुसार ६०० ते १२०० रुपये किलोने मिळत होते. आता ते ८०० ते १५०० रुपये किलोने मिळत आहेत, आणि ५५० रुपये किलोने मिळणारी सुरमई सद्य:स्थितीला ८०० रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे माशांच्या किमतीत प्रतिकिलोमागे १०० ते ३०० रुपयाने वाढ झाल्याने मासे खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. गेल्या काही काळात जिताडा माशालाही खवय्यांकडून मोठी मागणी असते. उत्तम प्रतीच्या जिताडय़ाचे दरही किलोमागे एक हजार ते १२०० रुपयांपर्यत पोहोचले आहेत.

मटण महाग

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथून ठाणे तसेच मुंबई बाजारात बकऱ्यांची आवक होत असते. सध्याबकऱ्यांची आवक कमी होत असल्याने मटणाच्या दरात वाढ झाली असल्याचे मटण विक्रेते उपेश कोथमिरे यांनी सांगितले. महिन्याभरापूर्वी ४८० ते ५०० रुपये किलोने मिळणारे मटण सध्या ५८० ते ६०० रुपये किलोने मिळत आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ग्राहकांकडून माशांना मोठी मागणी असते. परंतु सध्या कयार वादळामुळे मासेमारीवर बंदी लादल्यामुळे माशांच्या पुरवठय़ात घट झाली असून पुढील काही दिवसांत माशांच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. – सुरेंद्र पाटील, मासळी विक्रेते, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2019 2:40 am

Web Title: fish expensive akp 94
Next Stories
1 कल्याण-डोंबिवली पालिकेला लवकरच ‘आयएएस’ आयुक्त?
2 आदित्य ठाकरे नाही तर ‘या’ आमदाराला बनवा मुख्यमंत्री; ठाण्यात बॅनरबाजी
3 कामचुकारांवर ‘वॉच’
Just Now!
X