भाईंदर पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर रात्रीच्या सुमारास तरुण वर्ग मद्यपान करीत असल्यामुळे फेरफटका मारायला निघालेल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

इंदिरा गांधी उड्डाणपुलावर हे सारे प्रकार सुरू आहेत. भाईंदर पूर्व-पश्चिम परिसराला जोडण्यात आलेल्या या पुलावर दिवसभर सतत रहदारी सुरू असते. परंतु याच उड्डाणपुलावर रात्रीच्या सुमारास तरुणांकडून मद्य मेजवान्या झडत आहेत. या साऱ्या प्रकारामुळे परिसरात रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

भाईंदर पश्चिम परिसरात अनेक पर्यटकस्थळ असल्यामुळे मोठय़ा संख्येने प्रवासी या उड्डाणपुलाचा वापर करत असतात. याच उड्डाणपुलाचा वापर सध्या तरुण मद्य मेजवान्यांसाठी करीत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा या मेजवान्या झडल्यानंतर शिल्लक बाटल्या रस्त्यावर तशाच पडून असतात. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा तरुणांचे मद्यच्या नशेत भांडणे होत असतात. या मद्यपींशिवाय या उड्डाणपुलावर प्रेमीयुगुलांचीही हजेरी असल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मद्यपींना आता पोलिसांची भीती राहिलेली नाही आणि पोलीसही अशा घटनांकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे रोहित पाटील यांनी सांगितले.