शिवसेनेचा माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात

बदलापूर : राज्यात भाजपला दूर सारत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर विविध जिल्हा परिषदा, महापालिका आणि पंचायत समित्यांमध्येही महाविकास आघाडी आकार घेताना दिसत आहे. असे असले तरी बदलापुरात मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच खेचाखेच सुरू झाली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला पक्षात प्रवेश देत राष्ट्रवादी काँग्रेसने याची सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर, पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत पक्षवाढीसाठी प्रयत्न करणारच, अशी भूमिकाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली. असे असले तरी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेवर कुरघोडी सुरु केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या काळात मंजूर झालेल्या विविध प्रकल्पांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विरोध करण्यात आला होता. भुयारी गटार योजनेचे शुल्क देणे असो वा योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला देणे असो. राष्ट्रवादी काँग्रेसने थेट उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली आहे. त्यातच निवडणुकीची तयारी सर्व पक्षीयांकडून होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रभाकर पाटील यांना गळाला लावले आहे.

नुकताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाकर पाटील यांचा पक्षप्रवेश शहराध्यक्ष आशीष दामले यांनी घडवून आणला. त्यामुळे शहरात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या फळीला हा धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी काही शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रय केला जातो आहे. पक्षात वाढलेली इच्छुकांची संख्या आणि गटबाजीमुळे शिवसेनेतील काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोर चढला आहे.

शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे अद्यापपर्यंत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे शहरात पक्षवाढीसाठी  प्रयत्न करणे आमची जबाबदारी असून त्यानुसार काम करत आहोत. वरिष्ठांकडून आघाडीबाबत आदेश आल्यास त्यावेळी त्याबाबत बोलता येईल.

-आशीष दामले, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.