निर्माल्य कलशातील कचरा रस्त्यावर, रहिवाशांची गैरसोय

विरार पूर्वेच्या पालिकेच्या टोटाळे तलावात गुरुवारच्या गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. निर्माल्य कलशातील कचराही रस्त्यावर आला आहे. यामुळे या तलावात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या रहिवाशांची गैरसोय होत आहे.

विरार पूर्वेला पालिका मुख्यालयाला लागूनच टोटाळे हा प्रसिद्ध तलाव आहे. पालिकेने या तलावाचे सुशोभीकरण करून तेथे उद्यान, जॉगिंग ट्रॅक, कारंजे आदींची सोय केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या उद्यानाची दुरवस्था झालेली आहे. आता त्यात विसर्जनानंतर तयार होणाऱ्या कचऱ्याची भर पडली आहे. गुरुवारी संध्याकाळी तलावात गौरी गणपतींचे विसर्जन झाले होते. या विसर्जनानंतर येथे कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. निर्माल्य कलश पुरेसा नसल्याने कचरा रस्त्यात टाकण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठी दरुगधी पसरली आहे.

सकाळ आणि संध्याकाळ परिसरातले नागरिक या रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी आणि वॉक करण्यासाठी येत असतात. त्यांना या कचऱ्याचा अडसर होत आहे. यापूर्वीच तलावाची दुर्दशा झालेली होती. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी असलेली बाके तुटली होती, जागोजागी कचरा पसरलेला होता आणि त्यात आता ही नवीन भर पडली आहे, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.

विसर्जन काळात कचरा साचण्याचे प्रमाण जास्त असते. सर्वच तलावात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती असते. विसर्जनाच्या दिवशी पहाटेपर्यंत कामगार कामावर असतात. त्यामुळे कचरा सकाळी लगेच उचलला जात नाही. परंतु कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. नेहमीमेपक्षा कचरा जास्त असल्याने त्याला विलंब लागतो एवढाच फरक आहे.   सुखदेव दरवेशी, सहाय्यक आयुक्त, आरोग्य