संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी संकेतस्थळ सुरू केले आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे अर्जच दाखल होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या मंडप परवानगीत नवे विघ्न उभे राहिल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे १५०० नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. उत्सवाच्या मंडप उभारणीसाठी मंडळांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. गणेशोत्सवाच्या एक महिना आधीच महापालिका प्रशासन मंडप परवानगीची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइनद्वारे उपलब्ध करून देते. परवानगीसाठी मंडळाला मंडपाची माहिती, क्षेत्रफळाची जागा असा अर्ज भरून द्यावा लागतो आणि त्यासोबत पालिकेकडून मागील वर्षांत दिलेल्या परवानगीची प्रत जोडावी लागते. मंडप उभारणीसाठी वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला आणि अर्जातील जागेचे क्षेत्रफळ पाहून पालिका मंडप उभारणीसाठी परवानगी देते. त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. मात्र यंदा करोना ससंर्गाच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना केवळ ऑनलाइनद्वारे मंडप परवानगी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार दोन दिवसांपासून संकेतस्थळावर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. संकेतस्थळाद्वारे अर्ज दाखल होत नसल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. संकेतस्थळ सुरू केल्यानंतर परवानगीचे पान सुरू होत नसल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.

महापालिकेने हे संकेतस्थळ गणेशोत्सवाच्या दीड महिन्यांपूर्वी सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र एकच महिना शिल्लक असताना आता संकेतस्थळावरील पान सुरू होत नाही. त्यामुळे परवानगीसाठी अडथळे येत आहेत. परवानगी कधी घ्यावी आणि गणेशोत्सवाची पुढची तयारी कशी करावी, असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांना पडलेला आहे.

– समीर सावंत, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, ठाणे जिल्हा

संकेतस्थळ सुरू करण्यात अडथळे येत असतील, तर त्यामध्ये असलेल्या त्रुटी लवकरच दुरुस्त करण्यात येतील.

-संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका