‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून गिरीश कुबेर यांचे मार्गदर्शन; येत्या शनिवारी विरारमध्ये कार्यक्रम

विरार : दहा दिवसांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा सामान्य करदाता लाभार्थी आहे काय? सर्वसामान्यांच्या जीवनमानावर केंद्रीय अर्थसंकल्पाचा परिणाम काय? याबाबतचे सविस्तर विवेचन येत्या शनिवारी विरारमध्ये होणार आहे.

शनिवार, २० जुलै २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून होणाऱ्या ‘लोकसत्ता विश्लेषणा’साठी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे वक्ते असतील. संकल्प आणि अर्थसिद्धी या दिशेने हे मार्गदर्शन असेल.

मदर वेरोणिका हॉल, कार्मेल कॉन्वेंट हायस्कूल, आब्राहाम नाका, नंदाखाल, विरार (पश्मिच) येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तसेच काही जागा राखीव असेल.

अर्थसंकल्पाचा विविध माध्यम, स्वरूपात उहापोह होत आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पातील तरतुदींनी सकल राष्ट्रीय उत्पादन वाढणार का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. अर्थसंकल्प सादरीकरण आणि त्यातील समाविष्ट उपाययोजनांनी सर्वसामान्य करदात्यांना लाभ झाला काय किंवा सर्वसामान्यांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होणार काय, याबाबतचे विश्लेषण यावेळी केले जाईल. त्याचबरोबर येत्या कालावधीत देशाचा विकास कोणत्या दिशेने असेल, याबाबतचा भविष्यवेधही यावेळी घेतला जाणार आहे.

अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आलेल्या पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य नेमके काय व कशासाठी आहे? तसेच महागाई व चलनाचा विद्यमान दर गृहीत धरून वार्षिक आठ टक्के विकास दर गाठता येणे शक्य आहे काय? याची सविस्तर मांडणी या वेळी केली जाणार आहे.

कधी?

शनिवार, २०  जुलै

सायंकाळी ५ वाजता.

कुठे?

मदर वेरोणिका हॉल, कार्मेल कॉन्वेंट हायस्कूल, आब्राहाम नाका, नंदाखाल, विरार (पश्चिम)