शिंदे यांच्या देखरेखीखाली रेतीबंदर रस्त्याची डागडुजी

गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरील मोठय़ा खड्डय़ांमुळे ठाण्यासह आसपासच्या शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेल्या मुंब्रा रेतीबंदर मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी अखेर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी रात्री रस्त्यावर उतरावे लागले. तिथे रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहून पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण करून घ्यावी लागल्याने सत्ताधारी शिवसेनेची एकप्रकारे नाचक्की झाल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, शहरातील विविध मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठीही पालकमंत्र्यांनाच पुढाकार घ्यावा लागणार का, असा सवाल ठाणेकर करत आहेत.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने मुंब्रा रेतीबंदर मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. असे असतानाच या मार्गावर पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडल्याने येथून अवजड वाहतूक संथगतीने होत असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याचा परिणाम ठाणे, भिवंडी, कल्याण, मुंब्रा आणि शीळफाटा मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर दिसून येतो. या खड्डय़ांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असतानाही त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होताना दिसून येत होते, तर याच विभागाकडे बोट दाखवत महापालिका येथील खड्डे बुजविण्यास असमर्थता दाखवीत होती.

या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी मनसे आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. या रस्त्यावर राष्ट्रवादीचे कळवा-मुंब्य्रातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाआरती करत तीन दिवसात खड्डे बुजविले नाहीत तर रस्ता खोदण्याचा इशारा दिला होता. असे असतानाच रविवारी रात्री पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच पालिका अधिकाऱ्यांसोबत या मार्गाची पाहाणी केली आणि तिथे रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांनी पालिकेकडून खड्डे बुजविण्याची कामे करवून घेतली. खडीच्या साहाय्याने हे खड्डे बुजविण्यात आले आहेत. याच भागात गणेश विसर्जन घाट असल्यामुळे गणेशभक्तांचा तसेच वाहनचालकांचा प्रवास खड्डेमुक्त होणार आहे.

शहरातील रस्त्यांचे काय?

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री केलेल्या दौऱ्यानंतर मुंब्रा-रेतीबंदर मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र, ठाणे शहरातील महामार्ग, उड्डाण पूल तसेच अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले असून ते कधी बुजविले जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संदर्भात महापालिकेचे शहर अभियंता रतन अवसरमोल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मुंब्रा रेतीबंदर हा रस्ता महापलिकेच्या अखत्यारीत येत नसून तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. मात्र, या खड्डय़ांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असल्यामुळे पालकमंत्री व आयुक्तांच्या आदेशानंतर खड्डे बुजवण्यात आले.’ शहराच्या अन्य भागातही खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाऊस उघडताच खड्डे बुजविण्याची कामे लगेच सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.