अंबरनाथ-बदलापूर स्थानकात सुविधा नसल्याने नातेवाईकांचीही पंचाईत

रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी विविध सुविधा जाहीर करत असताना अपंगांसाठी मात्र प्राथमिक सुविधांची वानवाच अनेक रेल्वे स्थानकांवर पहायला मिळतो. अपंग प्रवाशांसाठी

रेल्वे स्थानकात येण्या-जाण्यासाठी वेगळी सुविधा नसल्याने अंबरनाथ आणि बदलापूरसारख्या गर्दीच्या स्थानकांवर त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. केंद्र सरकार सर्व योजनांप्रमाणे दिव्यांगांसाठीच्या मार्ग निर्मितीची जाहिरात मोठय़ा प्रमाणावर करत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच झालेले दिसते.

अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे नोकरदार वर्गाची शहरे म्हणून आता पुढे येत आहेत. पाच ते सहा लाखांच्या एकत्रित लोखसंख्येचा भार रेल्वे स्थानकांवर पडतो. रेल्वेच्या उत्पन्नात त्यामुळे कोटय़वधींची भर पडते आहे. मात्र त्या तुलनेत सुविधा मात्र प्रवाशांना मिळताना दिसत नाहीत. सर्वसाधारण प्रवाशांप्रमाणेच अपंगांचा प्रवास सुखकर करण्याकडेही रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसते. बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकात प्रतिदिन शंभरहून अधिक लोकलगाडय़ा ये-जा करतात. त्यातून सर्वसाधारण प्रवाशांप्रमाणेच अपंगही मोठय़ा प्रमाणावर प्रवास करताना दिसतात. मात्र आरक्षित डब्यातून सुखरूप प्रवास केल्यानंतर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांची खरी कसोटी लागते. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकातील पादचारी पुल हे सर्वसाधारण प्रवाशांसाठीच त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे अपंगांसाठी तिथे वेगळी काही परिस्थिती असेल याची शक्यता नाहीच. त्यात अपंगांची सायकल नेण्यासाठी वेगळा मार्ग उपलब्ध नसल्याने अपंगांच्या त्रासात अधिकच भर पडते. अपंगांना रेल्वे स्थानकात नेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते आहे. स्थानकात अपंगांसाठी सायकलीची उपलब्धता असते. मात्र पादचारी पुलावरून त्या सायकलीही उचलून नेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे अपंगांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दोन्ही स्थानकातील जिने आधीच अरुंद असल्याने लोकल आल्यानंतर पुलांवर मोठी गर्दी होते. त्यात अपंगांना स्थानकाबाहेर नेणे अशक्य होते. त्यावेळी १५ ते २० मिनिटे अपंगांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वाट पहावी लागते. त्यामुळे अनेकदा अपंग आणि त्यांचे नातेवाईक रुळावरून त्यांना बाहेर काढण्याचा धोका पत्करतात. सध्या अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना अमलात आणल्या आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून याबाबत काही विशेष होताना दिसत नाही. त्यामुळे आधुनिकतेकडे जात असताना अपंगांसाठी प्राथमिक सुविधा तरी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता अपंगांच्या नातेवाईकांकडून होत आहे.