उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम महिनाभरापासून सुरूच

ठाणे : दोन वर्षांपूर्वी कोटय़वधी रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आलेल्या मुंब्रा बाह्य़वळण मर्गावरील पुलाच्या बांधकामाच्या सळया पावसामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाहेर आल्या आहेत. त्यामुळे सार्वजानिक बांधकाम विभागातर्फे या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा वेग अतिशय संथ असल्यामुळे महिनाभराचा कालावधी उलटून गेला असला तरी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे या मार्गावर सकाळ आणि सायंकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने दोन वर्षांपूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. चार महिने दिवसरात्र सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ४६ लाख ७५ हजार ५४० रुपये खर्च करण्यात आले होते. पावसाळ्यात पुलावर साचणारे पाणी पुलाच्या खालील भागात झिरपत असते. यावर उपाययोजना म्हणून दुरुस्तीच्या काळात ‘वॉटर प्रूफ मेमब्रेन्स’ हे तंत्रज्ञान वापरून पुलावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र अवघ्या दोन वर्षांत या रस्त्याच्यी पुन्हा दुर्दशा झाली असून रस्त्याच्या कामासाठी खर्च केलेले कोटय़वधी रुपये पाण्यात गेले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

यंदा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात झालेल्या पावसामुळे या संपूर्ण पुलावर जागोजागी खड्डे पडले होते, तर पुलावरील काही ठिकाणचे डांबर वाहून गेल्याने बांधकामाच्या लोखंडी सळया उखडून वर आल्या होत्या. लोखंडी सळया वर आल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. त्यामुळे महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम पुन्हा हाती घेतले.

महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आलेले पुलाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील हा उड्डाणपूल वाहतूक कोंडीचे केंद्र बनला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांचा भार वाढला असून लोकल सेवा बंद असल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील कोंडीत मोठी भर पडत आहे.

आणखी आठवडाभर विलंब

सार्वजानिक बांधकाम विभागातर्फे हाती घेण्यात आलेले हे काम अतिशय वेगाने सुरू आहे. मात्र हा पूल अतिशय उंचावर असल्यामुळे आणि पुलाच्या सळयांचे फॅब्रिकेशनचे काम असल्यामुळे या कामाला वेळ लागत असल्याची माहिती सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. मात्र येत्या सहा दिवसांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र काम पूर्ण झाल्यावर वाहतूक तात्काळ सुरू करणे शक्य होणार नसून या ठिकाणची वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.