उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर; कडोंमपाचे दुर्लक्ष

उच्च न्यायालयाच्या कडक र्निबधानंतर कल्याण-डोंबिवली शहरात जागोजागी बेकायदा फलकबाजीने जोर धरला असून यामध्ये राजकीय नेते आणि पदाधिकारी आघाडीवर असल्याचे चित्र दिसू लागले आहे. कल्याण डोंबिवली शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळात काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी, चौकातील स्वयंघोषीत नेत्यांचे वाढदिवस, नियुक्तांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले आहेत. पालिका कर्मचारी या फलकबाजीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही दोन्ही शहरे विद्रुप होऊ लागली आहेत.

फलकबाजीने शहर विद्रुप करणाऱ्या सर्व पक्षीय नेते तसेच पक्षप्रमुखांना उच्च न्यायालयाने दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. या नेत्यांनी उच्च न्यायालयात यापुढे आमचा एकही कार्यकर्ता कोठेच फलकबाजी करणार नाही, असे हमीपत्र लिहून दिले आहे. तरीही नेत्यांना दाद न देता स्थानिक पातळीवरील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते कल्याण डोंबिवली, टिटवाळा परिसरात आपले वाढदिवस, पक्षीय नियुक्तीचे फलक बिनधास्तपणे लावून शहराचे विद्रुपीकरण करीत आहेत. शहर विद्रुप दिसले तर तेथील आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असे आदेश यापूर्वी न्यायालयाने आदेश दिले होते. त्यावेळी घाईने एका दिवसात शहरातील सर्व फलक काढून टाकण्यात आले होते.

कल्यामधील रेल्वे स्थानक परिसर, सहजानंद चौक, लालचौकी भागात काही कार्यकर्त्यांनी पालिकेची परवानगी न घेता फलकबाजी केली आहे. डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळ्यातही असेच चित्र दिसत आहे. न्यायालयाने शहरातील विद्रुपीकरणाची माहिती देण्यासाठी शहरातील काही वकिलांची नियुक्ती केली होती. परंतु, राजकीय मंडळींकडून नाहक त्रास होण्याच्या विचाराने काही वकिलांनी हे काम करण्यास अनुत्सुकता दाखविली असल्याचे समजते.