प्रशांत पंचाक्षरी, ज्येष्ठ वकील
देश, राज्य असो किंवा ठाणे शहर, सर्वच ठिकाणी गुन्हे घडत असतात. प्रत्येक गुन्हय़ामागे एक कारण दडलेले असते. गुन्हय़ांची पाश्र्वभूमी समजून घेतली पाहिजे. गुन्हे करणे ही एक मानसिकता असली, तरी ती एक प्रकारे विकृती किंवा मानसिक आजारच आहे. जन्मत: कोणीही गुन्हेगार नसतो. परिस्थिती आणि वातावरण यामुळे गुन्हेगारीचा प्रारंभ होतो. यामुळे गुन्हा करण्यापूर्वीच रोखायचे असेल तर समाजात प्रबोधन आणि चांगल्या विचारांची गरज आहे. प्रामुख्याने लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था या दोन गोष्टी गुन्हेगारीकडे वळण्यास कारणीभूत आहेत. त्याचबरोबर इतर संकल्पना, जसे जातिव्यवस्था, धर्म, प्रांतीयवाद आणि देश याही गोष्टी तितक्याच कारणीभूत आहेत. लोकसंख्या जेव्हा नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा सर्वच व्यवस्था कोलमडतात. आपल्या ठाणे शहराचा आजचा विचार केला तर अशीच अवस्था आहे. प्रचंड लोकसंख्येमुळे राहण्यासाठी आणि जगण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब केला जातो. यातून एक विकृत स्पर्धा सुरू होते, जिथे नीतिमत्तेला स्थान नसते, तिथेच गुन्हेगारीचे मूळ आहे. जसे पदपथांवर झोपणे कायद्याने गुन्हा आहे, तरी तो परिस्थितीमुळे घडतो. तसेच वास्तव्यासाठी खासगी व सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले जाते. इथूनच नियम आणि कायदा तोडण्यास सुरुवात होते.
या अतिक्रमणाचे पुढे भ्रष्टाचारामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात होते. अतिक्रमणे वाचविण्यासाठी संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांना ‘हप्ते’ दिले जातात. इथूनच झोपडपट्टी ‘दादा’ची सुरुवात होते. बेकायदेशीर कृतीतून मिळविलेल्या पैशांतून हेच पुढे लोकप्रतिनीधींपर्यंत मजल मारतात. आजची निवडणूक व्यवस्था पाहिली तर निवडणूक लढविणे सर्वसामान्यांचे काम राहिलेले नाही. या पैशामुळे कायदा व नियम मोडण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. याला काही अपवाद असतील. पैसा कमविणे मर्यादेच्या पलीकडे गेल्यामुळे हे लोकप्रतिनिधी ‘माणसांतून’ उठतात. कोणत्याही माणसाला किमान शांततेने जगता यावे आणि गुण्यागोविंदाने राहता यावे यासाठी अर्थ व सामाजिक व्यवस्था सक्षम असली पाहिजे. ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांची अवस्था पाहिली तर यापेक्षा काही वेगळे झालेले नाही. राजकारण्यांची हीच बौद्धिक दिवाळखोरी गुन्हेगारीला प्रवृत्त करते. कोणत्याही मार्गाने पैसे कमविण्याच्या हव्यासातून गुन्हेगारीचा प्रारंभ होत असल्यामुळे आर्थिक धोरणामध्ये महत्त्वाचे बदल होणे गरजेचे आहे. या शहरांमधून मोठय़ा प्रमाणावर उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांनी गुन्हेगारीला एक प्रकारे प्रोत्साहित केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याची विविधांगी आव्हाने पोलिसांपुढे आहेत.
तक्रार (एफआयआर) नोंदवून घेणारे पोलीस पुरेसे सक्षम आणि कायद्याविषयी फारसे शिक्षित नसतात. तक्रारदाराची नेमकी तक्रार समजून घेऊन ती योग्य प्रकारे कागदावर उतरविली जात नाही. तसेच तक्रार नोंदवूून घेताना काही वेळेस राजकीय हस्तक्षेप असतो आणि अनेकदा भ्रष्टाचार होतो. त्यामुळे प्राथमिक तपासात त्रुटी राहतात व त्याचा गैरफायदा घेऊन वकील वर्ग गुन्हेगारास सुटण्यास एक प्रकारे मदतच करतात. न्यायालयात साक्षी-पुराव्यांना महत्त्व आहे आणि जे न्यायालयात सादर होते त्याच आधारावर निकाल दिला जातो. त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. तक्रार नोंदवून घेण्यासाठी सक्षम अधिकारी नेमणे, तक्रार कशी नोंदवून घ्यावी याचे प्रशिक्षण देणे, गुन्हय़ांचा फक्त ‘शास्त्रीय’ पद्धतीने तपास करणे इत्यादी उपाययोजना करणे आवश्यक आहे. कायद्याचे ज्ञान व पळवाटा लक्षात घेऊन तपासात त्रुटी राहणार नाहीत याची पोलिसांनी काळजी घेतली तर कोणताही गुन्हा कायद्याच्या कसोटीवर खऱ्या अर्थाने उतरू शकेल आणि ‘संशयाचा फायदा’ घेऊन गुन्हेगार सुटणार नाहीत. हे ठाणे नव्हे तर सर्वच शहरांसाठी लागू पडते. सुरक्षाव्यवस्थेचे काम प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने होत नाही तोपर्यंत काहीच बदल अपेक्षित नाही. एखाद्या घटनेनंतर सुरक्षा ‘अजून टाइट’ केली म्हणजे काय? हे कोडे मला अजूनही उमगलेले नाही. सायबर गुन्हेगारी हे येत्या काळात मोठे आव्हान आहे. या ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी टेक्नोसॅव्ही अधिकाऱ्यांची भरती करणे गरजेचे आहे व त्यांचे पगार खासगी कंपन्यांच्या धर्तीवर असले पाहिजेत. जेणेकरून भ्रष्टाचाराला एक प्रकारे आळा घालता येईल. शहरांच्या सुरक्षेकरिता एखादी यंत्रणा काही दिवस चालते आणि काही काळानंतर ती यंत्रणा बंद पडल्याचे चित्र दिसते. म्हणून त्या सुरळीतपणे चालतात का, याचीही चाचपणी सातत्याने करणे गरजेचे आहे. प्रत्येक समाजात एक ‘कल्चर’ असते, तर पोलीस ठाण्यात ‘सब-कल्चर’ असते. तक्रारदाराला उर्मटपणाने मिळणारी वागणूक व भ्रष्टाचाराचे वातावरण ‘बहुतेक’ पोलीस ठाण्यात असते, ज्याला आपण ‘सब-कल्चर’ म्हणू या. हे ‘सब-कल्चर’चे चित्र जेव्हा बदलेल तेव्हाच खऱ्या अर्थाने गुन्हेगारांना जरब बसेल. याशिवाय गुन्हेगारी ‘मानसिकता’ बदलण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे असून त्यासाठी पोलिसांनी संबंधित तज्ज्ञांच्या साहाय्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुन्हेगारीकडे वळलेल्या घटकांचा अभ्यास होणे गरजेचे असून त्याआधारे त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात परत आणण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2016 रोजी प्रकाशित
गुन्हेगारीच्या मुळाशी बेकायदा बांधकामे
प्रामुख्याने लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था या दोन गोष्टी गुन्हेगारीकडे वळण्यास कारणीभूत आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-01-2016 at 02:14 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal constructions connection with crime