करोनाचे निर्बंध पाळून दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन

मुंबई/ठाणे : दरवर्षी घरातील दीड दिवसाच्या गणरायालाही वाजतगाजत समुद्रकिनारी नेऊन निरोप देणाऱ्या भाविकांना यंदा उत्सवातील उत्साहाला पूर्णपणे मुरड घालावी लागली. करोनाच्या निर्बंधांमुळे भाविकांनी घरात किंवा घराजवळच्या कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. नाकातोंडावर मुखपट्टी वापरून आणि अंतर नियमांचे पुरेपूर पालन करून आपल्या लाडक्या गणपतीची पाठवणी करण्यात आली. यावेळी वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी नसल्याने कोणत्याही प्रदूषणाविना अस्सल भक्तिभावाने वातावरण भारून गेले होते.

दरवर्षी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनालाही समुद्रकिनारी मोठी गर्दी होते. कुटुंबातील सदस्यांबरोबरच नातलग आणि सोसायटय़ांमधील रहिवाशांच्या सोबतीने गणरायाला वाजतगाजत निरोप दिला जातो. यंदा मात्र कुटुंबातील मोजकेच सदस्य विसर्जनाला येत होते. विसर्जनावर सरकारी यंत्रणांनी बंधने घातल्यामुळे यंदाचा विसर्जन सोहळा नक्की कसा असेल, कसा पार पडेल याबद्दल गणेशभक्त, पालिका-पोलीस यंत्रणा या सर्वानाच उत्सुकता होती. दीड दिवसाच्या गणपतीचे शांततापूर्ण विसर्जनामुळे पुढील दिवसांतील विसर्जनांची रंगीत तालीमच दीड दिवसांच्या विसर्जनाच्या निमित्ताने पाहायला मिळाली.

फिरती विसर्जन व्यवस्था

यंदा ठाणे, भिवंडी, बदलापूर या पालिकांनी विसर्जन घाट तसेच कृत्रिम तलावांवरील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइनद्वारे नोंदणीचा उपक्रम राबविला असून केवळ दोन ते तीनच जणांना मूर्ती विसर्जनासाठी येणे बंधनकारक केले होते. तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहरांमध्ये फिरती विसर्जन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली होती. असे असले तरी करोनाच्या पाश्र्वभूमीवर अनेक गृहसंकुलांनी आवारातच विसर्जन व्यवस्था उभारून तिथे गणेशमूर्तीचे विसर्जन केले. त्यामुळे यंदा सर्वच शहरांतील विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांवर नागरिकांची गर्दी ओसरल्याचे चित्र होते. काही भक्तांनी नदी, तलावात मूर्ती विसर्जन केले. तर शहापूर आणि मुरबाड या ग्रामीण भागात काही सामाजिक संस्थांनी घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी फिरती विसर्जन व्यवस्था तयार केली होती.