उल्हासनगरमधील तीन तरुणांना अटक; ‘१००’ क्रमांकावर एका रात्रीत अनेकदा दूरध्वनी

ठाणे : ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर रात्रीच्या वेळेस संपर्क साधून तीन तरुण तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अश्लील भाषेत संभाषण करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या गुन्ह्य़ाप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी तात्काळ तपास करून त्या तिघा तरुणांना अटक केली आहे.

मुकेश सक्सेना (१९), गिरीश सक्सेना (१९) आणि आसू गौड (२५) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे सर्व जण दोन महिन्यांपासून उल्हासनगर परिसरात भाडय़ाने राहत आहेत. मूळचे ते उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. हे तिघेही डोंबिवली परिसरात रंगकाम करतात. या तिघांनी २७ जूनला ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर रात्रीच्या वेळेत दूरध्वनी केला व तो घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर अश्लील शेरेबाजी केली.  समोरून बोलणारी व्यक्ती दारूच्या नशेत असावी, असा अंदाज बांधून या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर अशाप्रकारचे दूरध्वनी सातत्याने येऊ लागले. रविवारी रात्री ११ ते १.३० वाजेपर्यंत अशा प्रकारचे दूरध्वनी सातत्याने येत होते. त्यानंतर मात्र या कर्मचाऱ्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी तपास करून तिघांना अटक केली.

मुकेश, गिरीश आणि आसू हे तिघे जण स्वत:च्या मोबाइलवरून पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील शंभर क्रमांकावर दूरध्वनी करीत होते. त्यामुळे तिघांचे मोबाइल क्रमांक ठाणे नगर पोलिसांना नियंत्रण कक्षातून मिळाले. या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तिघांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली.

मानसिक विकृतीतून या तिघांनी हा प्रकार केल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यांनी यापूर्वी असे कृत्य केले आहे का, याचा शोध सुरू आहे.

मंगेश सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर