किशोर कोकणे
रिक्षाचालकांकडून ठाणे स्थानकात पळवापळवी सुरूच
ठाणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मतदान तसेच टाळेबंदीला घाबरून पळ काढलेले परप्रांतीय मजूर पुन्हा मुंबई-ठाणे गाठू लागले आहेत. ठाणे महापालिकेच्या वतीने या प्रवाशांची ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावर मोफत करोना चाचणी केली जाते. काही रिक्षाचालकांनी या परप्रांतीय प्रवाशांना चाचणीच्या रांगेतूनच पळवा-पळवी सुरू केली आहे. चाचणीविनाच हे प्रवासी शहरात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा करोनाचा धोका निर्माण होण्याची भीती आहे.
राज्यात टाळेबंदी लागू होण्याच्या भीतीने तसेच निवडणुकांमुळे मुंबई, ठाण्यातील अनेक परप्रांतीय मजुरांनी फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये गावी पलायन केले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोनाचा आलेख घसरू लागल्याने तसेच गावी जाऊन हाती काम मिळत नसल्याने हे मजूर पुन्हा मुंबई-ठाणे गाठू लागले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात दिवसाला २२ विशेष रेल्वे गाडय़ा थांबत आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश आणि ओदिशामधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. या प्रवाशांमुळे ठाण्यात करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने सॅटिस पुलावर करोना चाचणी केंद्र सुरू केले आहे. तसेच छुप्या पद्धतीने हे प्रवासी चाचणीविना जाऊ नये यासाठी रेल्वे स्थानकाच्या पुलाबाहेर आणि फलाटांवर स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, महापालिका सुरक्षा रक्षक तैनात असतात. स्थानकाबाहेर करोना चाचणीचे एकच केंद्र असल्याने तपासणीसाठी भलीमोठी रांग केंद्रावर लागत असते. याचा गैरफायदा घेत काही रिक्षाचालकांनी रांगेत उभ्या असलेल्या या प्रवाशांची पळवा-पळवी करण्यास सुरुवात केली आहे. या प्रवाशांना चाचणीविना शहरात दाखल करून एका प्रवाशाकडून ६०० किंवा त्याहूनही अधिकचे भाडे आकारले जाते. दररोज या रिक्षाचालकांना करोना चाचणी केंद्राच्या आवारातून हुसकावण्याचा प्रयत्न करतो. गुंडप्रवृत्तीचे रिक्षाचालक कोणाचेही ऐकत नाहीत. या रिक्षाचालकांकडे गणवेश आणि बॅजही नसतो, असे करोना चाचणी केंद्रावर तैनात असलेल्या महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.
‘रिक्षाचालकांकडून करोनाचा फैलाव’
राज्य सरकारने रिक्षाचालकांना टाळेबंदीच्या काळात परवानाधारक रिक्षाचालकांना १ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केली आहे. अशा पद्धतीने काही रिक्षाचालक सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालून करोनाचा फैलाव वाढवत असतील. तर अशा रिक्षाचालकांना अनुदान जाहीर करून उपयोग काय, असे मेघा गायकवाड या महिला प्रवाशाने सांगितले. ठाणे पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी सॅटिस पुलावर तैनात असतात. तसेच या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते, असे साहाय्यक पोलीस आयुक्त नीता पडवी यांनी सांगितले.