आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी
दहशतवादाचा सामना करण्यासाठी, विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, यासाठी ठाणे पोलिसांनी आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन पथनाटय़ स्पर्धेत उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला तर भिवंडीतील मोमीन महाविद्यालय आणि मुंब्य्रातील अब्दुल पटेल महाविद्यालय यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. सीएचएम आणि मोमीन या दोन महाविद्यालयांनी सोशल मीडिया आणि दहशतवादाचा धोका या विषयाला हात घालून दहशतवादाचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच अब्दुल पटेल या महाविद्यालयाने आधी राष्ट्र मग बाकी या विषयावर मूक अभिनय सादर करून देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये गुरुवारी ‘पोलीस महाकरंडक’ या आंतर महाविद्यालयीन पथनाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी व अभिनेत्री मुक्ता बर्वे उपस्थित होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे या पाच परिमंडळ स्तरावर या स्पर्धेच्या प्राथमिक फेरी घेण्यात आल्या होत्या. आधी राष्ट्र मग बाकी, सामाजिक शिस्त आणि दहशतवादावर नियंत्रण, सक्तीचे लष्करी शिक्षण आणि अंतर्गत सुरक्षा, सोशल मीडिया आणि दहशतवादाचा धोका असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मंगेश सातपुते, संतोष आगाशे आणि पोलीस उपायुक्त डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या फेरीमध्ये उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला तर भिवंडीतील मोमीन महाविद्यालय आणि मुंब्य्रातील अब्दुल पटेल महाविद्यालय यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. या तिन्ही विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि दहा हजार अशी रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे उत्कृष्ट अभिनेत्री, अभिनेता, दिग्दर्शक व लेखक आदींनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

आठ संघ अंतिम फेरीत
या स्पर्धेमध्ये एकूण ४३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी आठ महाविद्यालये अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते. यामध्ये कौसा येथील अब्दुल पटेल महाविद्यालय, मुंब्रातील मुंब्रा पारसिक महाविद्यालय, ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय, राबोडीतील सरस्वती महाविद्यालय, तसेच भिवंडीतील मोमीन महाविद्यालय आणि आटगांव महाविद्यालय, कल्याण येथील सोनावणे महाविद्यालय व उल्हासनगरमधील सीएचएम महाविद्यालयांचा समावेश होता.