नौपाडय़ातील घटना

पदवीधर असूनही बेरोजगार राहिलेला तरुण निराश होऊन मोबाइल चोर बनल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. त्याची कथा ऐकून ज्याचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न झाला, त्याने तक्रार नोंदविण्याऐवजी त्याला माफ केले. ठाणे पोलिसांनी मात्र त्याला पुन्हा चोरी न करण्याची तंबी दिली आहे.

नौपाडा येथील देवधर रुग्णालयाजवळ राहणारे माधव देवधर (७०) हे त्यांचा कॅनडाहून आलेला मित्र सदानंद जोशी यांच्यासोबत ६ सप्टेंबर रोजी भारतीय स्टेट बँकेच्या नौपाडा शाखेत पैसे भरण्यासाठी गेले होते. पैसे भरण्याची प्रकिया सुरू असताना त्यांना एका मित्राचा फोन आला. फोनवर बोलून झाल्यानंतर त्यांनी तो फोन तिथेच सोफ्यावर ठेवला व शेजारी असलेल्या मित्रासोबत गप्पा मारत बसले. इतक्यात त्यांचा क्रमांक आल्याने ते पैसे भरण्यासाठी बँकेच्या खिडकीजवळ गेले. त्यांचे मित्र सदानंदही त्यांच्यासोबत आले. दोन मिनिटांनी माधव यांना आपला फोन सोफ्यावर असल्याचे लक्षात आले. त्यांनी सोफ्यावर पाहिले तर त्यांचा फोन तिथे नव्हता. या प्रकरणी त्यांनी बँकेच्या व्यवस्थापक सरिता चौधरी यांच्याकडे तक्रार केली. चौधरी यांनी सीसीटीव्ही चित्रण तपासले असता त्यात चोरी करणारा तरुण दिसला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तोदेखील याच बँकेचा खातेदार असल्याचे सांगितले. त्यानंतर सीसीटीव्हीवरील छायाचित्राच्या मदतीने बँक कर्मचाऱ्यांनी तासाभरात मोबाइल चोरणाऱ्या तरुणाची माहिती आणि मोबाइल क्रमांक शोधून काढला. त्याला संशय येऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्याला इतर काही कामाचे निमित्त काढून शाखेत बोलावले. यानंतर नौपाडा पोलिसांनाही बोलाविण्यात आले.

तरुण बँकेत येताच त्याला सीसीटीव्ही चित्रण दाखवण्यात आले. चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच तो भांबावला. मात्र त्याने सांगितलेली कहाणी ऐकल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली. पदवीधर असूनही नोकरी नसल्याने आपण हा मोबाइल चोरल्याची कबुली या तरुणाने दिली. त्याची कहाणी ऐकून माधव देवधर यांना दया आली. त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करायची नाही, असे ठरविले. असे असले तरी पोलिसांनी मात्र या तरुणाची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच परिसरात कोणाचाही मोबाइल चोरी झाल्यास पहिल्यांदा तुझी चौकशी करू, असा दमही त्यांनी त्या तरुणाला दिला.