लोकप्रतिनिधींचा रेल्वे अधिकाऱ्यांना सवाल; रेल्वे पुलांसाठी ४ वर्षांतच ५ कोटींचा खर्च
भगवान मंडलिक, कल्याण</strong>
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रेल्वे स्थानकांमधील रेल्वे पादचारी पूल, उड्डाणपूल, रेल्वे फाटक या कामांच्या देखभाल-दुरुस्ती कामासाठी पालिकेने मागील चार वर्षांत रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून चार कोटी ९५ लाख १० हजार ४२८ रुपये खर्च केले आहेत. २०१३ ते २०१८ या कालावधीत कल्याण-डोंबिवली पालिकेने धनादेशाच्या माध्यमातून रेल्वेकडे हा निधी वर्ग केला आहे. एवढा निधी पुलांवर खर्च होऊनही पुलांची रडगाणी सतत का सुरू आहेत, असा प्रश्न राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केला.
कोपर ते ठाकुर्ली दरम्यानच्या पुलांवर गेल्या वर्षी मध्य रेल्वेने पालिकेकडून ६२ लाख १५ हजार ६७३ रुपयांचा निधी घेऊन दुरुस्तीची कामे केली. कोपर उड्डाणपूल धोकादायक आहे, हे त्याच वेळी रेल्वे अभियंत्यांच्या का निदर्शनास आले नाही. ही दुरुस्ती करताना रेल्वेने पालिकेला कोपर पूल धोकादायक स्थितीत असल्याने त्यावर देखभालीचा खर्च करणे योग्य होणार नाही, असे सांगितले असते तर पालिकेचे पैसे वाचले असते, असे बैठकीत उपस्थित नगरसेवक राजन सामंत यांनी सांगितले. जुलै २०१८ मध्ये पूल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मग मे २०१९ पर्यंत आठ महिन्यांत पूल धोकादायक झाल्याचा साक्षात्कार रेल्वे अधिकाऱ्यांना कसा काय झाला, असा प्रश्न सामंत यांनी केला.
फेब्रुवारी ते एप्रिल २०१३ या कालावधीत कल्याण पूर्वेतील लोकग्राम पुलाच्या दुरुस्तीसाठी पालिकेने ५२ लाख ९४ हजार रुपये रेल्वेकडे वर्ग केले. कल्याण पूर्वेतील लोकवस्ती वाढत असल्याने हा अडीच मीटर रुंदीचा पादचारी पूल सहा मीटर करावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक नीलेश शिंदे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे.
ठाकुर्ली येथील रेल्वे मार्गावरील नवीन उड्डाणपुलाच्या कामासाठी पालिकेने दोन कोटी ४२ लाख ६३ हजारांचा निधी खर्च केला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये पालिका हद्दीतील कोपर ते विठ्ठलवाडी, टिटवाळा परिसरातील रेल्वे पादचारी पुलांच्या देखभालीसाठी ५० लाख रुपयांचा निधी पालिकेने रेल्वेकडे वर्ग केला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये अशाच दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने ८७ लाख २५ हजार रुपये रेल्वेच्या माध्यमातून खर्च केले आहेत. दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही रेल्वे हद्दीतील पादचारी पूल अरुंद असून नादुरुस्त असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे प्रशासन अशाप्रकारे पालिकेकडून देखभालीच्या कामासाठी निधी घेते आणि त्याचा विनियोग योग्यप्रकारे करत नाही. यात संशय घेण्यास वाव आहे, अशी टीका स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी महासभेत केली आहे. या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे, असे म्हात्रे यांनी सांगितले.
महावितरणची अडवणूक
कोपर उड्डाणपुलावरून डोंबिवली पश्चिमेत वीजवाहिन्या गेल्या आहेत. उच्च दाब क्षमतेच्या या वीजवाहिन्या रेल्वे मार्गाखालून टाकल्या तर पुलावरून टाकण्यात आलेल्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होणे किंवा इतर होणारे बिघाड कायमस्वरूपी मिटतील, असे महावितरणने रेल्वे प्रशासनाला कळवले आहे. परंतु अशाप्रकारच्या कामास रेल्वेकडून ‘ना हरकत’ मिळत नसल्याने ही कामे करणे शक्य होत नाही. रेल्वे मार्गाखालून उच्चदाब क्षमतेची वीजवाहिनी टाकण्याच्या खर्चासह प्रस्ताव महावितरणने तयार करून रेल्वेकडे पाठविला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी हा मूळ प्रस्ताव मान्य न करता महावितरणचा हा प्रस्ताव गुंडाळून ठेवला. गणेशोत्सवात रेल्वेने महावितरणाला वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात घरोघरी गणपती, सार्वजनिक गणेशोत्सव असतात. डोंबिवली पश्चिमेत स्थलांतरित वीजवाहिन्यांमुळे विजेचा लपंडाव सुरू झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. १५ दिवसांपूर्वी रेल्वेने महावितरणाला कोपर पुलावरील वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.