सांडपाण्यावर पिकवलेल्या भाजीपाल्याची विक्री करणारी मोठी साखळी कार्यरत

ठाणे : पुणे, नाशिक या भागांतील भाजी असल्याची बतावणी करून ग्राहकांना सांडपाण्यावर पिकवलेल्या भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची मोठी साखळी ठाणे शहरात कार्यरत आहे. हा भाजीपाला आरोग्यास हानीकारक असल्याने ठाणे महापालिकेने पालिका क्षेत्रात आढळणारे असे भाजीमळे उद्ध्वस्त करण्यात येणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागांतील मोकळ्या जागांवर पालेभाज्यांची शेती करण्यात येत असून त्यासाठी नाल्यातील सांडपाण्याचा वापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पुढे आल्या होत्या. या भाज्या पुणे, नाशिक येथून आणल्या असल्याची बतावणी करून ग्राहकांना विकल्या जात आहेत. सांडपाण्यासोबत रसायने मिसळत असल्याने त्यावर वाढणारी ही भाजी आरोग्यास घातक ठरू शकते. याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर  प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंबंधी बैठक घेऊन अशा प्रकारची शेती नष्ट करण्याचा निर्णय घेतला.

शहरातील मोकळ्या जागांवर आजही पालेभाज्यांची शेती केली जात आहे. त्यासाठी नाल्यातील सांडपाणी वापरले जात असल्याची बाब सातत्याने पुढे येत आहे. याबाबतचे काही पुरावेही डॉ. शिंदे यांनी सादर केले. त्यानंतर या सर्वच ठिकाणी प्रदूषण, आरोग्य विभागासह संबंधित सहायक आयुक्तांनी पाहणी करावी आणि शेतीसाठी नाल्यात टाकण्यात आलेले पंप जप्त करावेत. तसेच या शेतीच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे आणि  मातीचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी दिले. तसेच तपासणी अहवालानंतर तेथील शेतीवर कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बेकायदा मळे कुठे?

ठाण्यातील समतानगर, गांधीनगर, सिडको, कळव्यातील मफतलाल कंपाऊंड, रेल्वे रुळाच्या परिसरात पालेभाज्यांची शेती केली जात असून या शेतीसाठी नाल्यातील सांडपाण्याचा वापर केला जात आहे. तसेच या भाजीपाल्याची विक्री व्हावी यासाठी पुणे, नाशिक आणि सांगली जिल्ह्य़ातील भाजीपाला असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात असल्याचे बैठकीत उघडकीस आले. या प्रकरणी रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ठाण्यातील समतानगर तसेच शहराच्या विविध भागांत पालेभाज्यांची शेती केली जाते. या शेतीसाठी नाल्यात पंप टाकून सांडपाणी वापरले जात असल्याची बाब दिसून आली. सांडपाण्यावर पिकविलेल्या भाजीपाल्यांमुळे कर्करोगासह गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून याबाबत महापालिकेकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

– डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण</strong>