आयुष्यात कायम लहान मुलांची आई होण्याचे भाग्य मला लाभले, याबाबत मी स्वतला भाग्यशाली समजते. अशा भावना अंबरनाथमधील ‘नीला बालसदन’च्या लता म्हस्के यांनी व्यक्त केल्या.
दहा वर्षांपासून अनाथ मुलांची आईप्रमाणे सेवा केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले, तेव्हा त्यांनी वरील उद्गार काढले. कस्तुरबा गांधी यांच्या ७१ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सासवड येथील कार्यक्रमात आदर्श माता पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, महाराष्ट्र शाखा व गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी, आगाखान पॅलेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कस्तुरबा संस्थेच्या हनुमंत जगनगडा यांनी म्हस्के यांना स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित केले. यावेळी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ. शोभा रानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अंबरनाथमधील महाराष्ट्र बालग्राम, सुनीता बालग्राम केंद्रातील नीला बालसदनात अनाथ मुलांची आईप्रमाणे लता म्हस्के या गेल्या दहा वर्षांपासून सेवा करत आहेत. येथे येणारी मुले ही मोठी होऊन निघून जातात. मात्र या मोठय़ा मुलांची आई जरी मी असले तरी बालसदनात नव्याने लहान अनाथ मुले येतात. त्यामुळे प्रत्येक वेळी मला लहान मुलाची आई होण्याचे भाग्य लाभते असे त्या म्हणाल्या.
नीला बालसदनाच्या अध्यक्षा दीपा राहतेकर आणि कार्यकारिणीच्या सदस्यांची मदत मिळाल्यानेच हा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर अंबरनाथच्या लता म्हस्के यांना आदर्श माता पुरस्कार मिळाला आहे.