ठाणे, नवी मुंबईच्या कोटय़ातून ३० दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा; टंचाईच्या संकटातून दिलासा
पाणीसंकटामुळे त्रस्त असलेल्या मीरा-भाईंदरच्या रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या कोटय़ातून प्रत्येकी १५ म्हणजेच एकूण ३० दशलक्ष लिटर पाण्याचा वाढीव कोटा मीरा-भाईंदर महापालिकेला मिळणार आहे.
सध्या स्टेम प्रधिकरणाकडून ४८ तास पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. त्याशिवाय दररोज ८६ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असतानाही कपातीमुळे मीरा-भाईंदरला ७२ दशलक्ष लिटर पाणीच देण्यात येत आहे. दुसरीकडे एमआयडीसीकडून शहराला होणारा पाणीपुरवठा तब्बल साठ तास बंद ठेवण्यात येत असून मंजूर ५० दशलक्ष लिटर पाण्यापैकी केवळ ३५ दशलक्ष लिटर पाणीच एमआयडीसीकडून देण्यात येत आहे. याचा मोठा फटका शहराला बसत असून शहरातली पाण्याची परिस्थिती स्फोटक झाली आहे. या परिस्थितीतून मिरा भाईंदरला दिलासा देण्यासाठी शहराचा कोटा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली व मीरा-भाईंदर यांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. उल्हास नदीतून ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ातून ३० दशलक्ष लिटर पाणी कमी करून त्यातील १५ दशलक्ष लिटर पाणी मीरा-भाईंदरला व पंधरा दशलक्ष लिटर पाणी कल्याण-डोंबिवलीला देण्याचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी दिले.
याव्यतिरिक्त एमआयडीसीकडून नवी मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठय़ातून १५ दशलक्ष लिटर पाणी कमी करून ते मीरा-भाईंदरला वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून मंजूर ५० दशलक्ष लिटर पाण्याचा पूर्ण कोटा पुन्हा मिळणार आहे. मात्र स्टेम व एमआयडीसीकडून पाणीपुरवठा ४८ तास बंद ठेवण्याचे धोरण यापुढेही सुरूच रहाणार आहे. परंतु बंद व्यतिरिक्त इतर दिवशी पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार असल्याने सध्याच्या परिस्थितीतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.