News Flash

मराठीचा झेंडा मिरवणारी मनसे गुजराथी मतांच्या शोधात

राज शुक्रवारी डोंबिवलीत प्रचारसभेसाठी येत आहे त्यावेळी ही भेट घडवून आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

मराठीचा झेंडा मिरवणारी मनसे गुजराथी मतांच्या शोधात
नुकत्याच झालेल्या पर्युषण पर्वात मांसाहारबंदीस विरोध करत मनसेने गुजराथी आणि जैन समाजाला अंगावर घेतले होते.

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींचे आयोजन
विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत गुजराथी समाजावर वाग्बाण सोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीत मात्र या समाजातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची तयारी चालविली आहे. नुकत्याच झालेल्या पर्युषण पर्वात मांसाहारबंदीस विरोध करत मनसेने गुजराथी आणि जैन समाजाला अंगावर घेतले होते. कल्याण-डोंबिवलीतील अनेक प्रभागांमध्ये या समाजाची मते निर्णायक ठरू लागल्याने मनसेच्या स्थानिक नेत्यांनी या भेटीसाठी आग्रह धरला आहे. हा आग्रह मान्य करत येत्या काही दिवसांत राज स्वत: या दोन्ही समाजातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची तयारी करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राज शुक्रवारी डोंबिवलीत प्रचारसभेसाठी येत आहेत. त्यावेळी ही भेट घडवून आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कल्याणमधील बाजारपेठ विभाग, डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक भागात गुजराती समाज, व्यापारी वर्ग अधिक संख्येने आहे. गोग्रासवाडी, एमआयडीसी, रामनगर, शिवमार्केट, नेहरू रस्ता, फडके रस्ता या परिसरातही या समाजाचे प्राबल्य दिसून येते. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत या पट्टय़ात मनसेने भाजपला धक्का देत चांगले यश मिळवले होते. यंदा मात्र परिस्थिती काही प्रमाणात बदलली असल्याची जाणीव मनसेच्या उमेदवारांना होऊ लागली आहे. गुजराथी आणि विशेषत: जैन समाजात मनसेविषयी अढी असल्याचे चित्र दिसू लागल्याने पक्षाच्या उमेदवारांना अक्षरश: घाम फुटू लागला आहे. त्यामुळे ही अढी काही प्रमाणात का होईना दूर व्हावी यासाठी राज ठाकरे यांच्या डोंबिवली दौऱ्या दरम्यान या भेटींचे आयोजन करण्यात आले आहे, असे मनसेच्या एका वरिष्ठ स्थानिक पदाधिकाऱ्याने सांगितले.

का पडली गरज?
डोंबिवलीच्या तुलनेत कल्याणमध्ये मनसेची ताकद फारशी नाही. या पक्षाची जोरदार हवा असतानाही कल्याणमधील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावणे मनसेला जमले नव्हते. कल्याणमधील शिवाजी चौक परिसर ते लालचौकी, डोंबिवलीत रामनगर, शिवमार्केट, गांधीनगर, पी अ‍ॅन्ड कॉलनी प्रभागांमध्ये गुजराती, मारवाडी समाजाची मते अधिक आहेत. या प्रभागांमधून यंदा चांगले मतदान होईल, अशी अपेक्षा भाजपचे स्थानिक नेते बाळगून आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत डोंबिवलीतील अनेक प्रभागांमध्ये मनसेने धक्का दिला होता. विशेषत: संघ आणि ब्राह्मणबहुल प्रभागांमध्ये मनसेला भरभरून मतदान झाले होते. मनसेला यंदा नगरसेवकांची संख्या दोन आकडय़ांपर्यंत घेऊन जायची असेल तर याच प्रभागांमधून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. असे असताना गुजराती, मारवाडी समाजाच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता स्थानिक उमेदवारांना वाटू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2015 2:25 am

Web Title: mns trying to catch gujarati vots
टॅग : Mns
Next Stories
1 आयुक्तांच्या छायाचित्रावरून सेना आक्रमक
2 उमेदवारांच्या प्रचारासाठी कलाकारांची मांदियाळी
3 ३१ वर्षांनंतर शाळा सोबतींची मैफल
Just Now!
X