दिव्यातील मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत

अवघ्या सहा-सात महिन्यांवर येऊ घातलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांतील अंतर्गत कुरघोडय़ा आणि समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून मनसेच्या दोन नगरसेवकांना आपल्या पक्षात आणत शिवसेनेने याची सुरुवात केली आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत सेनेचा बालेकिल्ला असलेल्या दिव्यातून निवडून आलेले मनसेचे शैलेश पाटील आणि सुनीता मुंडे यांनी शुक्रवारी मातोश्री येथे जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.

ठाणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात पक्षबदल झाले होते. तोच प्रकार यंदाही घडण्याची शक्यता असून शिवसेनेने शुक्रवारी त्याची सुरुवात केली. दिव्यातील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील आणि सुनीता मुंडे हे दोघे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून महापालिका वर्तुळात सुरू होती. तसेच महापालिकेच्या आगामी निवडणूकीपूर्वी ते शिवसेनेत प्रवेश करतील, असेही बोलले जात होते. ते भाकीत शुक्रवारी खरे ठरले. दिव्यातील विकासकामे व्हावीत म्हणून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे शैलेश पाटील यांनी सांगितले. तसेच मनसेतील नेत्यांवर कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बालेकिल्ला पुन्हा बळकट

  • दिवा परिसर हा एके काळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत येथून मनसेचे शैलेश पाटील आणि सुनीता मुंडे हे दोघे निवडून आल्याने शिवसेनेला धक्का बसला होता. दिव्यातील हा पराभव शिवसेना नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.
  • येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका सार्वत्रिक दिव्यातील प्रभाग संख्येत वाढ होणार आहे. ही निवडणूक पॅनल पद्धतीने झाली तर मनसेचे हे दोघे नगरसेवक उपयोगी ठरू शकतील. हे हेरून शिवसेनेने वर्षभरापूर्वीच पाटील आणि मुंडे या दोन्ही नगरसेवकांना गळाला लावले होते.
  • नुकत्याच झालेल्या परिवहनच्या निवडणुकीत दोघांनी शिवसेनेला मतदान केल्याची उघड चर्चा सुरू होती.
  • मनसेपाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळ टाकण्यात आल्याची चर्चा सुरू असून येत्या काही महिन्यांत या पळवापळवीला आणखी जोर चढण्याची चिन्हे आहेत.