भाविकांच्या दारात गणपती विसर्जनाची व्यवस्था; रस्त्यांवरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कडोंमपाचा निर्णय

कल्याण : गणेश विसर्जनाच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुका व भाविकांची गर्दी यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियोजन करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने आता विसर्जनाची व्यवस्था भाविकांच्या दारात नेऊन उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड, अडीच, पाच दिवसांच्या घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी महापालिका एक ट्रक सजवून त्यात लहानसा जलकुंभ बनवणार आहे. नागरिकांनी विसर्जनासाठी रस्त्यांवर गर्दी करण्याऐवजी या फिरत्या जलकुंभातच मूर्ती विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

कल्याण, डोंबिवली शहरांत मोठय़ा प्रमाणात घराघरांत गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. या घरगुती गणरायांना दीड, अडीच किंवा पाच दिवसांनी निरोप देण्यात येतो. त्यामुळे या दिवशी शहरांत मोठय़ा प्रमाणात मिरवणुका निघतात. या मिरवणुकांचा ताण शहरातील वाहतूक व्यवस्थेवर पडतो. आधीच या दोन्ही शहरांत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे, त्यात या मिरवणुकांमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. हाच विचार करून पालिकेने विसर्जनाकरिता फिरत्या जलकुंभाची व्यवस्था केली आहे.

या योजनेनुसार एक ट्रक सजवून त्यामध्ये पाण्याने भरलेला एक जलकुंभ (सिंटेक्स टाकी) ठेवण्यात येणार आहे. हा जलकुंभ असलेला ट्रक पालिकेच्या प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत विसर्जनाच्या दिवशी फिरवला जाईल. ट्रकवर तैनात कर्मचाऱ्यांकडे आपल्या मूर्ती सोपवून नागरिक गणेश विसर्जन करू शकतील, अशी माहिती कडोंमपाच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी दिली. जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी या जलकुंभात विसर्जन केले तर रस्ते, खाडीकिनारा किंवा कृत्रिम तलावांच्या परिसरात होणारी गर्दी नियंत्रणात येईल, असा विश्वास पोफळे यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणारे निर्माल्य जमा करण्यासाठी प्रभागवार निर्माल्य संकलन टाक्या ठेवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खाडीकिनारी, शहराच्या विविध भागांत अग्निशमन जवान वाहनांसह तैनात असतील. निर्माल्य संकलनासाठी सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी विभागवार नियुक्त केले आहेत. गणेशोत्सव काळात रस्त्यावर कोठेही कचरा, निर्माल्य दिसणार नाही, अशी व्यवस्था ठेवण्याचे आदेश आयुक्त बोडके यांनी दिले आहेत.

३०  कल्याणमधील विसर्जन स्थळे

४० डोंबिवलीतील विसर्जन स्थळे

१५ कृत्रिम तलावांची उभारणी

२२१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी

८९ गृहनिर्माण संस्थांना परवानगी

२२३ कॅमेऱ्यांची नजर

याशिवाय गणेश विसर्जन मिरवणुका मार्ग, ४२ ठिकाणी २२३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. संध्याकाळी सात ते शेवटचे विसर्जन होईपर्यंत विद्युत पुरवठा अखंड सुरळीत राहावा म्हणून २९०० प्रखर दिवे, ८२ विद्युत मनोरे उभारण्यात येणार आहेत.