रेल्वे स्थानकात तिरंगा धुळीत; जागरुक तरुणाचा पाठपुरावा

मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनच्या स्वच्छतागृहाबाहेर राष्ट्रध्वज धूळ खात आणि तंबाखू, पानांच्या पिंक झेलत पडल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला.
हा राष्ट्रध्वज स्वच्छतागृहाबाहेरच्या भिंतीवर गोळा करून टाकलेल्या अवस्थेत पडला होता. अत्यंत मळलेला, पानाच्या पिंक असलेला हा ध्वज डोंबिवलीतील एका तरुणाच्या नजरेस पडताच त्याने रेल्वे प्रशासनाच्या नजरेस ही बाब आणूनही दिली. मात्र, ‘हा ध्वज ‘आमचा’ नाही’, असे उत्तर त्याला मिळाले. या तरुणाने अधिक पाठपुरावा केल्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तो ध्वज स्वच्छ करण्यासाठी नेला. मात्र याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
शनिवारी ठाण्याच्या दिशेने जाणारी गाडी कळवा स्थानकात थांबली असता या गाडीत असलेल्या प्रतीक जोशी या तरुणाला फलाट क्रमांक दोनच्या कडेला एका भिंतीवर पडलेले एक फडके दिसले. या पांढऱ्या पण मळलेल्या फडक्यावर अशोकचक्राचे निळे आरे पाहून मात्र त्याचे डोळे विस्फारले आणि गाडी ठाण्याच्या दिशेने सुटता सुटता त्याला या पांढऱ्या रंगाबरोबरच केशरी आणि हिरवा रंगही दिसला आणि रेल्वेच्या हद्दीत ध्वजाचा अवमान होत असल्याची तक्रार करण्यासाठी प्रतीक तातडीने स्थानक अधीक्षकांचे कार्यालय गाठले. तेथे कोणी नसल्याने या राष्ट्रध्वजाबद्दल त्याने तेथील कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि त्या कर्मचाऱ्यांना तो फलाट क्रमांक दोनवर घेऊन गेला.
संविधानानुसार राष्ट्रध्वजाचा अपमान हा मोठा गुन्हा आहे. कळवा स्थानकात पडलेला राष्ट्रध्वज संविधानाने आखून दिलेल्या तत्त्वानुसारच त्याच आकाराचा होता; मात्र तो अनेक ठिकाणी फाटला होता. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांकडे याबाबत पिच्छा पुरवल्यानंतर त्यांनी तो धुण्यासाठी नेल्याचे प्रतीकने नमूद केले.

‘हा ध्वज आमचा नाही’
राष्ट्रध्वज पाहताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. हा ध्वज आत्ताच कोणी तरी टाकला असावा. रेल्वे स्थानकात अशा अनेक गोष्टी बाहेरून आणून टाकल्या जातात; मात्र हा ध्वज आमचा नाही, अशी सारवासारव या कर्मचाऱ्यांनी केल्याचे प्रतीक याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.