नव्या अधिकाऱ्यांकडून विश्वास वाढवण्याचा प्रयत्न

ठाणे : राज्य सरकारने नव्याने नियुक्त केलेले ठाणे आणि भिवंडी महापालिकांच्या आयुक्तांनी पदभार स्वीकारताच करोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आखण्याचे संकेत दिले आहेत. ठाण्यात एकाही रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश नवे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले, तर भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया यांनीही करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चार कलमी कार्यक्रमाची घोषणा केली.

करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने राज्य सरकारने मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील चार महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली केली. यापूर्वी भिवंडी महापालिकेतही आयुक्त बदल करण्यात आला होता. ठाणे महापालिकेत नव्याने नियुक्त करण्यात आलेले आयुक्त डॉ. शर्मा यांनी सकाळीच पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत कोणत्याही रुग्णाचा उपचारा अभावी मृत्यू होता कामा नये यासाठी प्रयत्नांची शर्थ करू, असे आवाहन संबंधितांना केले.  रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत उपचारासाठी जागा मिळायला हवी आणि त्यासाठी ज्या सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, त्या निर्माण करण्यावर भर देऊ, असेही ते यावेळी म्हणाले. प्रत्येकाचा जीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याने त्यासाठी टीम म्हणून काम करूया, असे आवाहनही त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

करोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे, त्या सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

भिवंडीचे नवनियुक्त आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला. भिवंडीतील करोना नियंत्रणासाठी चार कलमी कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी बुधवारी सांगितले.

भिवंडीत चार कलमी कार्यक्रम

करोना नियंत्रणासाठी भिवंडीत चार कलमी कार्यक्रम करणार असल्याचे नवे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले. शहरातील एकमात्र इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयावर अधिक भार असल्याने महापालिका प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या तसेच शहरातील इतर रुग्णालय व्यवस्थापनासोबत चर्चा करून करोणासाठी अधिक खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. शहरात करोनाविषयी जनजागृती करणे गरजेचे असून त्यासाठी शहरातील मशिदीच्या मौलवी- मौलाना यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांची मदत घेतली जाणार आहे. शहरात सध्या करोनाच्या केवळ ५० चाचण्या होत असून हे प्रमाण वाढवून शहरात दररोज १५० चाचण्या करण्यात येणार आहेत. यासोबतच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी होणे गरजेचे असून या कामासाठी आरोग्य विभाग, आंगणवाडी सेविका आणि शिक्षक यांचे पथक तयार करण्यात येणार आहे, असे डॉ. आशिया यांनी सांगितले.