10 April 2020

News Flash

एसटीचे आगार नव्हे, समस्यांचे आगार!

अवस्था पाहता गेल्या ६० वर्षांत एसटीत कधी बदल झालाच नाही का, असा प्रश्न पडतो.

महामुंबई क्षेत्रातील एसटीच्या स्थानकांत असुविधांचा मुक्काम

लोकसत्ता प्रतिनिधी :– पालिकांच्या बससेवा, रेल्वे, मेट्रो, अ‍ॅपआधारित टॅक्सीसेवा, रिक्षा अशा विविध वाहतूक साधनांमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई यासारख्या शहरांत राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बससेवेची गरज नसल्याचे मत नेहमीच व्यक्त होते. मात्र, प्रत्यक्षात लांब पल्ल्याच्या किंवा दूरच्या प्रवासासाठी आजही या शहरांतील नागरिक एसटीचा पर्याय निवडत असल्याचे दिसून येत आहे. या शहरांतील विविध ठिकाणच्या एसटीच्या आगारांच्या जागेवर कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय, मिनी मंत्रालय, अद्ययावत सुविधा उभारण्याची स्वप्ने नेहमीच दाखवली जातात. मात्र, प्रत्यक्षात आज या आगारांची अवस्था पाहिली तर, हे ‘एसटीचे आगार आहे की समस्यांचे’ अशी प्रतिक्रिया उमटल्यावाचून राहात नाही.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, पालघर या परिसराचा समावेश असलेल्या महामुंबई क्षेत्रात एसटीची जवळपास २० स्थानके आणि आगार आहेत. यापैकी मुंबई सेंट्रल, कुर्ला, परळ ही मुंबईतील, खोपट, वंदना, ठाणे स्थानक, कल्याण, वाशी, पनवेल व भिवंडी ही ठाणे जिल्ह्यातील तर वसई, नालासोपारा, पालघर ही पालघर जिल्ह्यातील महत्त्वाची बसस्थानके व आगार आहेत. या महत्त्वाच्या आगारांची ‘लोकसत्ता’च्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला असता, जवळपास प्रत्येक आगाराची सध्या दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. धुळीचे साम्राज्य, स्वच्छता, रंगरंगोटी आणि प्रवासी सुविधा यांचा सार्वत्रिक अभाव या आगारांमध्ये दिसून येतो. एसटीच्या बसगाडय़ांची अवस्थाही फारशी चांगली नाही.

एसटीने राज्यभरातील बसस्थानके व आगारांच्या स्वच्छतेसाठी तीन वर्षांसाठी एका कंपनीला दिलेल्या ४६३ कोटी रुपयांच्या कंत्राटाबाबतही पुनर्विचार सुरू आहे. ही अवस्था पाहता गेल्या ६० वर्षांत एसटीत कधी बदल झालाच नाही का, असा प्रश्न पडतो. एसटी महामंडळाच्या मुख्यालयाकडेही दुर्लक्ष झाले आहे. आता या ठिकाणी मिनी मंत्रालय उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु असुविधाग्रस्त आगार, विश्रांती कक्षांची दुरवस्था, साध्या बस, निमआरामबरोबरच शिवशाहीसारख्या नवख्या ब्रँडचीही झालेली दयनीय अवस्था पाहता सर्वसामान्यांना स्वस्तात वाहतुकीची सेवा देणाऱ्या एसटीचा प्राधान्यक्रमच चुकतो आहे की काय, अशी शंका येते.

आगार व बस स्थानकाची

दुर्दशा पाहता यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधला असता त्याला प्रतिसाद दिला नाही. तर देओल यांच्या कार्यालयात संपर्क साधला, तर कर्मचाऱ्यांनी जनसंपर्क अधिकारी यांचाशी बोला असे सांगितले.

नूतनीकरणही धीम्या गतीने

मुंबई महानगर क्षेत्रातील ११ बस स्थानके व आगाराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पेण, पालघरमधील नवघर, बोईंसर, सफाले, अलिबाग, खोपोली, पनवेल, ठाणेमधील वंदना, भिवंडी, कल्याण बस आगाराचा समावेश आहे. पेण, नवघर आणि सफाले बस स्थानकाच्या कामाचे आदेश काढले असून बोईसर, अलिबागची निविदा प्रक्रिया सुरू आहे. यात पनवेल एसटी आगार व बस स्थानकाचे काम खासगी लोकसहभागातून केले जाणार आहे. मात्र ही कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पनवेलसह अन्य बस स्थानके व आगाराचे नूतनीकरण करण्यासाठी वारंवार निविदा व प्रक्रियाच केल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही.

प्रसाधन की अस्वच्छतागृहे?

कुर्ला आगारातूनही राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटी गाडय़ा सुटतात. आगारात प्रवासी बसण्याच्या ठिकाणी बऱ्यापैकी स्वच्छता दिसून येते. विश्रांती कक्ष असलेल्या इमारतीकडे जाण्यापूर्वी सुरक्षा रक्षक दिसतात. परंतु प्रवेश करताना तैनात केलेला सुरक्षा रक्षक विचारण्याचीही तसदी घेत नाही. त्यामुळे चालक-वाहकांच्या विश्रांती कक्ष इमारतीपर्यंत सहज पोहोचता येते.

इमारतीत असलेल्या विश्रांती कक्षाची अवस्थाही मुंबई सेन्ट्रलमधील विश्रांती कक्षासारखीच. भिंतींचे प्लास्टर निघालेले, इमारतीचा व इमारतीच्या आतल्या बाजूने उडालेला रंग, प्रसाधनगृहाची दुरवस्था व त्याच स्थितीत कर्मचाऱ्यांकडून त्याचा होणारा वापर पाहता त्याच्या आरोग्याची चिंताही सतावते. आगारात फेरफटका मारताना एसटी बसगाडय़ांची अवस्था पाहवत नाही.

  •  दररोज सुटणाऱ्या, येणाऱ्या बसफेऱ्या – ७१८
  • आगाराचे उत्पन्न- ७ लाख ७१ हजार रुपये

माखलेल्या खुर्च्या  , सुरक्षेचा अभाव

सर्वात जुन्या अशा मुंबई सेन्ट्रल आगारात लालबाग-परळ, गिरगावबरोबरच अनेक भागातून प्रवासी येतात. गणेशोत्सव, होळी या काळात एसटी पकडण्यासाठी मोठी गर्दी येथे आजही होते. हे आगार सध्या सुविधांनी ग्रस्त आहे. येथे ४९ मजली मिनी मंत्रालय उभारण्याची योजना आहे. ९ ते १४ व्या मजल्यापर्यंत एसटी महामंडळाचे मुख्यालय आणि १५ ते ४९ मजल्यापर्यंत शासनाच्या विविध विभागांना भाडय़ाने देऊन त्यातून महामंडळाला महिना १६ ते १७ कोटी रुपये उत्पन्नही मिळणार आहे. पण, सध्या येथे मेट्रो-३च्या कामामुळे धुळीचे साम्राज्य आहे. धुळीने माखलेल्या खुर्च्या साफ करून कर्मचाऱ्यांच्या दिवसाला सुरुवात होते. सुरक्षा व्यवस्थेचा येथे लवलेशही नाही. रात्रपाळी करून किंवा दिवसभर गाडी चालवून आलेला थकला भागलेला चालक-वाहक विश्रांती कक्षात  जमिनीवर एखादी चादर किंवा टॉवेल अंथरून झोपतो. या कक्षात प्रसाधनगृहे असून नसल्यासारखीच.

गंजलेल्या खिडक्या, फुटलेल्या काचा, काही बंद पडलेले पंखे अशीच अवस्था. परिवर्तन बस (लाल डबा), निमआराम बस, शिवशाही बसगाडय़ांमध्ये फक्त अस्वच्छताच दिसते. शिवशाही बसची अवस्था पाहून दोन वर्षांपूर्वी सेवेत आलेल्या नव्या कोऱ्या वातानुकूलित बस याच का, असा प्रश्न पडतो.

  •  दररोज सुटणाऱ्या, येणाऱ्या बसफेऱ्या – ४९८
  •  आगाराचे उत्पन्न-  ९ लाख ६० हजार रुपये

ठाण्यातील स्थानकांत बजबजपुरी

गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्य़ाचे झपाटय़ाने नागरूकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील लोकसंख्या झपाटय़ाने वाढली आहे. मात्र, जिल्ह्य़ातील ग्रमीण भागात राहणारे नागरिक एसटी महामंडळाच्या बसचा वापर करतात. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळाच्या बस स्थानकांमध्ये कोणतेही बदल झालेले पाहायला मिळत नाही.

ठाणे शहरात एसटी महामंडळाची एकूण तीन बस स्थानके आहेत. त्यांपैकी खोपट बस आगार हे सर्वात मोठे असून या बस आगारावरून पुणे तसेच कोकण अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या बसगाडय़ा सुटतात. त्यामुळे या बस स्थानकावर मोठय़ा प्रमाणात प्रवाशांचा राबता असतो. मात्र, या बस स्थानकात प्रवाशांना पाणी पिण्यासाठी केवळ दोन नळ असून त्यातील एक नळ तुटला आहे. स्थानकातील महिलांसाठीचे स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याचे दिसून येते. प्रवासी महिलांना त्यांच्या बाळाला स्तनपान देता यावे यासाठी या बस स्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आला होता, परंतु आता या हिरकणी कक्षाला बाहेरून कुलूप असलेले चित्र पाहायला मिळत आहे. महामंडळाच्या कोणत्याही बस स्थानकांमध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंद असतो, परंतु खोपट स्थानकात रिक्षांचा मुक्तपणे वावर दिसून येतो. या बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम असून बस उभ्या राहणाऱ्या फलाटाजवळच राडारोडा पडलेला पाहायला मिळत आहे. शहरातील वंदना बस स्थानक हे आकाराने लहान असून या स्थानकातील कचरा सर्वप्रथम लक्ष वेधून घेतो. स्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये दरुगधीचे साम्राज्य दिसून येते.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस स्थानकातील आवस्था बिकट असल्याचे पाहायला मिळते. या बस स्थानकाच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून अनेकदा छताची माती पडत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते. तसेच या बस स्थानकामधील स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेचा आभाव दिसत येत आहे.

वाशीचे आगार आहे कुठे?

मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेच्या वाशी परिवहन बसआगारातच एसटीचे बसस्थानक आहे. वाशी सेक्टर नऊ येथील एसटीच्या बसस्थानकात दररोज आठ बसच्या फेऱ्या होत होत्या. त्यामध्ये एक मुक्कामी बस असे. या ठिकाणी एसटीच्या तिकीट आरक्षणाचीही सुविधा होती, मात्र एनएमएमटीच्या बसस्थानकाचे नूतनीकरण सुरू असल्याने

येथील एसटीच्या कारभारावर परिणाम झाला आहे. शीव-पनवेल महामार्गाजवळील उड्डाणपुलाखाली सध्या एसटीचे बसस्थानक हलवण्यात आले आहे.  एसटी महामंडळाने बसआगारासाठी नवी मुंबईतील तुर्भे येथे भूखंड आरक्षित करून घेतला होता. मात्र, गेली अनेक वर्षे या भूखंडावर आगाराची वीटही रचलेली नाही.

कल्याण, भिवंडीत ‘दुर्दशावतार’

कल्याण आणि भिवंडी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून राज्यात विविध ठिकाणी जाण्यासाठी बसगाडय़ा सुटतात. या दोन्ही बस स्थानकांतून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, या दोन्ही स्थानकांत मोठी दुरवस्था पाहायला मिळत आहे. या दोन्ही बस स्थानकांची स्वच्छतागृहे ही अतिशय बकाल झालेली आहेत. तर स्थानकांच्या इमारतींनाही अनेक ठिकाणी तडे गेलेले पाहायला मिळतात. तसेच स्थानकाच्या आतमधल्या बाजूस असलेली भूमिगत गटारेही उघडी आहेत. या उघडय़ा गटारांमधून मोठय़ा प्रमाणात दरुगधी पसरत असून या उघडय़ा गटारांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच कल्याण बस स्थानकातून कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन आणि नवी मुंबई महापालिका परिवहनच्या बसगडय़ाही सुटतात. या बस गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. मात्र, या बस गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उभे राहण्यासाठी बस थांबे नाहीत. त्यामुळे हे प्रवासी बस येताच ती पकडण्यासाठी धावत सुटतात. वेगाने येणाऱ्या बस गाडय़ा आणि त्यामागे धावत सुटणारे प्रवासी यामुळे कल्याण बस स्थानकात अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

(संकलन – सुशांत मोरे, आशिष धनगर, संतोष जाधव, संतोष सावंत) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 1:20 am

Web Title: not a stockpile of st a resort for problems akp 94
Next Stories
1 नागरी वस्तीत बिबटय़ाचे पिल्लू आईच्या प्रतीक्षेत
2 गृहिणींचे बजेट कोलमडले!
3 चर्चेविनाच २६० प्रस्ताव मंजूर
Just Now!
X