रविवारी भिवंडीत बॅंकेसमोर दोन गटामध्ये वाद होऊन त्यांनी बॅंकेत घुसण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तर शनिवारी दिवा परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कॅनरा बॅंकेसमोर आंदोलन करून रस्ता अडवून धरला होता.

भिवंडीतील जकात नाका परिसरामध्ये असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर नागरिकांची दिवसभर मोठी गर्दी होती. या शाखेमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये रांगेवरून वाद झाले. या वादातून धक्काबुक्की झाली. शिवाय नागरिकांनी थेट बॅंकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांची मदत घेतली. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

दिवा साबा परिसरात असलेल्या कॅनरा बँकेसमोर शनिवारी दुपारच्या सुमारास काही नागरिकांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मोठय़ा संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने होते. बॅंकेचे कामकाज बंद झाल्याच्या निषेधार्थ या मंडळींनी आम्हाला पैसे हवेत, अशी घोषणाबाजी सुरू केली होती. त्यांच्यावर वाहतुकीला अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज काही बँका खुल्या

सोमवारच्या गुरुनानक जयंतीमुळे बॅंकांना सुट्टी असली तरी त्याचा ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून काही बॅंकांनी चलन बदलण्यासाठी सुट्टी रद्द केल्याचे घोषित केले आहे.याचा लाभही नागरिकांना यामुळे घेता येणार आहे. सहकारी बँकांनी यासाठी मोठा पुढाकार घेतला असून नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पुणे पीपल्स सहकारी बॅंकेच्या ठाणे शाखेच्यावतीने सांगण्यात आले.