पालिका नगररचनाकार, वास्तुविशारदावरही गुन्हे

कल्याणमधील टावरीपाडा येथे राहणाऱ्या एका जमीन मालकाची जमीन शहरातील एका विकासकाने करारनाम्याने विकसित करण्यासाठी घेतली होती. विकासक, वास्तुविशारद यांनी पालिकेच्या नगररचना विभागातील तत्कालीन साहाय्यक संचालकाच्या संगनमताने करारनाम्याप्रमाणे जमीन विकसित न करता, अधिकची जमीन बांधकामासाठी वापरली. याप्रकरणी जमीन मालकाने कल्याण न्यायालयात विकासकाविरुद्ध दावा दाखल केला होता. या दाव्याची दखल घेत न्यायालयाने विकासक मे. दत्तात्रय हौसिंग डेव्हलपर्सचे किशोर देसाई, वास्तुविशारद शोभना देशपांडे आणि कल्याण डोंबिवली पालिकेतील तात्कालीन साहाय्यक संचालक नगररचनाकार चंद्र प्रकाश सिंग यांच्या विरुद्ध फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जमीन मालक अंकुश केणे यांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला. केणे यांनी कल्याणमधील गौरीपाडा येथे आपल्या कुटुंबीयांची असलेली जमीन विकासासाठी विकासक देसाई यांना दिली होती. विकासक करारनाम्याचे पालन करीत नव्हता. त्यामुळे जमीन मालक केणे यांनी कल्याण सत्र न्यायालयात विकासक देसाई, वास्तुविशारद देशपांडे आणि पालिका अधिकारी सिंग यांच्या विरुद्ध दिवाणी दावा दाखल केला होता. न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी विकासकाला १७८५ चौरस मीटर जागेवर बांधकाम करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता या तिन्ही आरोपींनी संगनमत करून बांधकामासाठी वाढीव क्षेत्र वापरून जमीन मालक केणे यांची फसवणूक व अपहार केल्याने त्यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.